मास्क लावण्यास सांगितल्याने डॉक्टर पतीची दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 19:04 IST2021-03-31T19:02:11+5:302021-03-31T19:04:38+5:30
दिव्यांग आरोग्य कर्मचारी भारत संभाजी नरवाडे हे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सहायक पदावर कार्यरत आहेत.

मास्क लावण्यास सांगितल्याने डॉक्टर पतीची दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण
गंगाखेड (जि. परभणी) : दोन्ही पायाने अपंग असलेल्या दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून काठीने त्याला दोघांनी मारहाण केली. ही घटना उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी डॉक्टर पतीसह अन्य एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्यांग आरोग्य कर्मचारी भारत संभाजी नरवाडे हे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सहायक पदावर कार्यरत आहेत. २८ मार्च रोजी ते घरी असताना, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी फोन करून डॉ. प्रिया शिंदे यांना अँटिजेन किट द्यायचे आहेत, तुम्ही कार्यालयात जाऊन त्यांना किट द्या, असे सांगितले. त्यामुळे भारत नरवाडे हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आले. त्यावेळी डॉ. प्रिया शिंदे यांचे पती गजानन शिंदे, त्यांचा खासगी चालक व आरोग्य कर्मचारी दहिफळे अँटिजेन किट नेण्यासाठी कार्यालयात आले.
यावेळी डॉ. शिंदे यांचे पती गजानन शिंदे व त्यांच्या खासगी चालकाच्या तोंडाला मास्क नसल्याने तोंडाला मास्क लावा आणि बाहेर थांबा, असे सांगण्यात आले. भारत नरवाडे यांनी आरोग्य कर्मचारी दहिफळे यांना अँटिजेन किट दिल्यानंतर डॉ .शिंदे यांचे पती गजानन शिंदे व खासगी चालकाने भारत नरवाडे यांना शिवीगाळ केली. तसेच गजानन शिंदे यांनी दोन्ही पायाने अपंग असलेल्या भारत नरवाडे यांच्या हातातील काठी घेत त्यांच्या हातावर, पाठीत मारहाण केली. त्यानंतर, दोघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची फिर्याद भारत नरवाडे यांनी पोलीस ठाण्यात दिल्यावरून डॉ. प्रिया शिंदे यांचे पती गजानन शिंदे व चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे हे करीत आहेत.