दहावीच्या विद्यार्थ्यांबाबतच्या सीबीएसईच्या निर्णयाविषयी नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:59+5:302021-02-06T04:29:59+5:30
परभणी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन अर्थात, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय बोर्डाच्या वतीने घेण्यात ...

दहावीच्या विद्यार्थ्यांबाबतच्या सीबीएसईच्या निर्णयाविषयी नाराजी
परभणी : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन अर्थात, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय बोर्डाच्या वतीने घेण्यात आला आहे. बोर्डाच्या या निर्णयाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम केला आहे. त्यामध्ये दहावीच्या परीक्षेत एकाही विद्यार्थ्यांना नापास न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तसेच दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाइव्ह सब्जेक्टच्या आधारावर ठरविली जाणार आहे. बोर्डाच्या निर्णयाविषयी अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे झाले, तर विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची कमी होईल. परीक्षेचे त्यांना महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचे मत पालकांसह शिक्षकांनीही व्यक्त केले आहे.
काय आहे नवीन नियम
सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार, दहावीच्या परीक्षेत पास किंवा नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त ५ विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्याचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पाच म्हणजेच दहावी पास, असा निर्णय झाला आहे.
पालकांच्या प्रतिक्रिया
सीबीएसईचा निर्णय समर्थनीय नाही. कारण उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धतीत यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल. परीक्षेचे महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षिणक वाटचालीस अडथळा निर्माण होईल. मागणी नसताना हा निर्णय झाला आहे.
- प्रा.प्रमोद ढालकरी, पालक, सेलू
सीबीएसई अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश हा काठिन्य पातळीचे शिक्षण असा आहे. आता विद्यार्थ्यांना नापासच करायचे नसेल, तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कस लागणार नाही, तसेच पाल्याची गुणवत्ता काय आहे, हे पालकांना कळणार नाही. त्यामुळे हा चुकीचा निर्णय आहे.
- दादाराव ताठे, पालक, सेलू
विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे. नापासच करायचे नाही, ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी कळणार? परीक्षेवरूनच विद्यार्थ्यांनी भविष्यात काय? करायचे हे ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नापास करायचे नसेल, तर परीक्षेची गरज काय?
- प्रणाली दुकले, विद्यार्थिनी, सोनपेठ