सरसगट उत्तीर्ण करण्याची मागणी
परभणी : राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसगट उत्तीर्ण करावे, अशी मागणी निलेश राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामीण रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता खराब असल्याने ग्रामस्थांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
प्रवासी निवाऱ्यांना जिल्ह्यात अवकळा
परभणी : एस.टी. महामंडळाच्या ग्रामीण भागातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात आसन व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा महामंडळाने प्रवासी निवाऱ्यांच्या ठिकाणी ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथील वसंतराव नाईक यांचा पुतळा ते सुपर मार्केट या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत. हा रस्ता प्रमुख वर्दळीचा असून, वाहनधारकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहेत.
एकेरी मार्गावर विरुद्ध बाजूने वाहतूक
परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्ते एकेरी वाहतुकीसाठीच वापरले जातात. मात्र मागच्या काही दिवसांपासून या नियमाला फाटा दिला जात असून, या रस्त्यावरुन दुहेरी वाहतूक केली जात आहे. आधीच अरुंद रस्ते, त्यात दोन्ही बाजूने वाहतूक होत असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.