गंगाखेड येथे ८० वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:07 IST2019-04-29T18:05:03+5:302019-04-29T18:07:20+5:30

टेलिफोन ऑफीस रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळले होते

death of 80-year-old man in Gangakhed dut to heatwave | गंगाखेड येथे ८० वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू 

गंगाखेड येथे ८० वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू 

गंगाखेड (परभणी ) : वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्याने वृद्ध इसमाचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. 

शहरातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या टेलिफोन ऑफीस रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास एक अनोळखी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  जमादार वसंतराव निळे, सुरेशराव पाटील, मुक्तार पठाण, नगरसेवक शेख कलिम, सय्यद खिजर, शेख राजू आदींनी बेशुद्धावस्थेतील वृद्ध इसमास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी हरकळ, परिचारिका विजयमाला घोबाळे, गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र काही वेळातच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळ आढळुन आलेल्या मतदान कार्डवरून पंढरीनाथ किशनराव कांबळे ( ८०, रा. माकेगाव ता.रेणापूर जि.लातुर ) अशी त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिली. आज (दि. २९ ) दुपारी चार वाजता मयत कांबळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईक आले नसल्याने हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे.

Web Title: death of 80-year-old man in Gangakhed dut to heatwave