खोट्या अॅट्रॉसिटीचा पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल न्यायालयाने केला रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:16 IST2019-02-05T19:14:33+5:302019-02-05T19:16:34+5:30
आरोपीला मदत करण्यासाठीच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अंतीम अहवाल दिला असल्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला

खोट्या अॅट्रॉसिटीचा पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल न्यायालयाने केला रद्द
परभणी : अॅट्रॉसिटी प्रकरणी खोटी फिर्याद दिल्याचा जिंतूर येथील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी दिलेला अहवाल परभणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी- फलके यांनी फेटाळण्याचा आदेश दिला आहे़
या प्रकरणासंदर्भात माहिती देताना अॅड़ जितेंद्र घुगे यांनी सांगितले, जिंतूर तालुक्यातील वरुड येथील भीमराव कान्होजी हजारे यांनी अकोली येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर रोप वाटिका सामाजिक वनीकरण कार्यालयातील लागवड अधिकारी एस़ आऱ खुपसे यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती़ त्यावेळी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची फिर्याद हजारे यांनी दिली़ या प्रकरणी लागवड अधिकारी खुपसे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात चार्जसीट दाखल न करता तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी फिर्याद खोटी असल्याचा अंतीम अहवाल सत्र न्यायालयात दाखल केला होता़ या प्रकरणात फिर्यादी भीमराव हजारे यांच्यातर्फे युक्तीवाद करताना अॅड़ घुगे म्हणाले, या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा जबाब घेतलेला असून, त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे़ तसेच फिर्यादीच्या पुष्ट्यर्थ विविध कागदपत्रांचा दाखलाही देण्यात आला़ या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठीच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अंतीम अहवाल दिला असल्याचा युक्तीवाद घुगे यांनी केला़ हा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी हा अहवाल फेटाळण्याचा आदेश दिला.