Parabhani: शॉर्टसर्किटने कापूस पेटला, त्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेतकऱ्याचे घर भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:43 IST2025-03-05T13:42:12+5:302025-03-05T13:43:04+5:30
आहेर बोरगाव येथील घटना; आगीत शेतकऱ्याचे पावणे तेरा लाखांचे नुकसान झाले आहे

Parabhani: शॉर्टसर्किटने कापूस पेटला, त्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेतकऱ्याचे घर भस्मसात
- मोहन बोराडे
सेलू (परभणी): तालुक्यातील आहेर बोरगाव येथील एका घरात शॉर्टसर्किटने आग लागली. त्यानंतर काही क्षणात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असून शेतमाल, दागिने, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून १२ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बोरगाव येथील शेतकरी हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांनी पत्र्याचे शेड करून घर केले आहे. बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटने घरातील कापसाने पेट घेतला. आग लागल्याचे निदर्शनास येताच हरिभाऊ लहाने त्यांच्या पत्नी अर्चना व मुलगी वैष्णवी यांनी घराबाहेर धाव घेतली. काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केले. यातच आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. लहाने कुटुंब आणि ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्यातून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.
सोयाबीन विक्रीची रोख रक्कम भस्मसात
या आगीत घरातील ७५ क्विंटल कापूस, ७ क्विंटल तूर, ४ क्विंटल ज्वारी, ६ क्विंटल गहू, सोयाबीन विक्रीची रोख रक्कम १ लाख ७५ हजार आणि ५ तोळे सोने यासह संसारोपयोगी साहित्य जळून १२ लाख ६३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी मोताळे ग्रामसेवक साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.