परभणी मनपासाठी काँग्रेसचा आघाडीचा निर्णय उद्या; तर भाजपची शिंदेसेनेसोबत बोलणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:16 IST2025-12-18T16:15:57+5:302025-12-18T16:16:33+5:30
परभणीत राजकीय पक्षांच्या हालचालींना येतोय वेग

परभणी मनपासाठी काँग्रेसचा आघाडीचा निर्णय उद्या; तर भाजपची शिंदेसेनेसोबत बोलणी सुरू
परभणी : महापालिका निवडणुकीसाठी आता आघाडी व युतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसकडून १९ डिसेंबर रोजी परभणीत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, तर भाजपने शिंदेसेनेसोबत बोलणी सुरू केली.
परभणी महापालिकेसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरीही आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत देण्यात आला. त्यानुसार १९ डिसेंबरला काँग्रेसची स्थानिकची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी सांगितले.
भाजपच्या श्रेष्ठींकडून युतीसाठी आधीच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यातच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही हिरवा कंदिल दाखविला. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून वाटाघाटी अजून ठरल्या नसल्याचे भाजप महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी युतीबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना नाहीत. आम्ही सध्या तरी स्वबळावर तयारी करीत असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही निवडणूक समिती जाहीर केली. खा. फौजिया खान, माजी आ. विजय गव्हाणे यांची निवडणूक समिती नेमली. तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना जिल्हा प्रभारी नेमले. तेच पुढील निर्णय घेणार आहेत. उद्धवसेनेची मंडळीही आघाडीसाठी अनुकूल असली तरीही सन्मानजनक तोडग्याची त्यांना प्रतीक्षा आहे. महानगराध्यक्ष डॉ. विवेक नावंदर यांनी आधीच तसे संकेत दिले आहेत.