परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश
By विजय पाटील | Updated: December 11, 2024 15:02 IST2024-12-11T15:02:03+5:302024-12-11T15:02:31+5:30
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश
परभणी : शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीमुळे निषेधासाठी जमलेल्या जमावाने आंदोलनाला हिंसक वळण दिले. जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.
शहर व जिल्ह्यात असलेले तणावाचे वातावरण पाहता हे कलम लावण्याची विनंती पोलिस अधीक्षकांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते लागू केले. यामुळे जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे. भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश केले आहेत. ११ डिसेंबरच्या दुपारी १ वाजेपासून हे आदेश लागू राहतील. ध्वनिक्षेपकावरून ते पोलिसांनी जाहीर करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
दुपारी आंदोलन चिघळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र, याच वेळी अचानक आंदोलक महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. एकीकडे शहरात तणावपूर्ण शांतता असताना पुन्हा आंदोलन चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.