Child line stopped child marriage in Gangakhed with the help of the administration | गंगाखेडमध्ये चाईल्ड लाईनच्या टिमने प्रशासनाच्या मदतीने रोखला बालविवाह
गंगाखेडमध्ये चाईल्ड लाईनच्या टिमने प्रशासनाच्या मदतीने रोखला बालविवाह

गंगाखेड: तालुक्यातील एका गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईनच्या टिमला मिळाली. यावरून मंगळवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची मदत चाईल्ड लाईनने वधु-वराच्या पालकांचे समुपदेशन करत बालविवाह रोखण्यात यश मिळविले. 

तालुक्यातील एका गावात दि. ७ मे मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजता १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती हेल्प लाईन नंबर १०९८ च्या माध्यमातून चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांना मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड येथील तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्या मदतीने जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातील जिल्हा संरक्षण अधिकारी सुभाष कुलकर्णी, विधी सल्लागार बाळासाहेब सूर्यवंशी, समुपदेशक अनंता सोगे, ग्रामसेवक डी. एम. मुंडे, जमादार हरीभाऊ शिंदे, दत्तराव पडोळे यांच्या टिमने आज सकाळी गावास भेट देत तक्रारीची पडताळणी केली.

मुलीचे वय १५ वर्ष असल्याचे उघडकीस येताच चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी वधु वराच्या पालकांचे समुपदेशन केले. तसेच पालकांकडुन हमीपत्र लिहून घेत हा बालविवाह रोखण्यात यश मिळविले. यावेळी गंगाखेड महिला व बालविकास कार्यालयाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एस.बी. वाघमारे, विस्तार अधिकारी प्रकाश होळंबे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.एच. चव्हाण, गट समन्वयक महेश गौरशेटे यांनी गावाला भेट देवुन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होऊ नये असे अवाहन केले.


अल्पवयीन मुलींचा बालविवाह करू नये
तालुक्यातील पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलींचा बालविवाह करू नये मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाची काही मदत हवी असल्यास प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे सांगत ग्रामीण भागातील कुठल्याही गावात अल्पवयीन मुलीच्या बालविवाहचे प्रकार घडत असल्यास चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे अवाहन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी लोकमतशी बोलतांना केले.

Web Title: Child line stopped child marriage in Gangakhed with the help of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.