लाचखोर परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:14 IST2025-04-01T12:11:57+5:302025-04-01T12:14:58+5:30

नावंदे व बस्सी या दोघांनी दीड लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण राज्यभर गाजले.

Bribed Parbhani District Sports Officer Kavita Navande sent to 14 days judicial custody | लाचखोर परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लाचखोर परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

परभणी : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी या दोघांना दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पुन्हा रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगात रवानगी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नावंदे व बस्सी या दोघांनी दीड लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. २७ मार्च रोजी परभणीत हे प्रकरण घडले होते. दरम्यान, नावंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली होती. यामध्ये दीड लाखांची रोकड व साडेचार लाखांचे दागिने असा अंदाजे सहा लाखांचा ऐवज आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर पुणे येथील फ्लॅटची झडती घेतली असता तेथे फ्लॅटच्या खरेदीसह पुणे जिल्ह्यात खरेदी केलेल्या दोन ते तीन एकर जमिनीची कागदपत्रे आढळून आल्याचे सांगण्यात आले. नावंदे यांना आता किमान सात दिवसांसाठी जामिनासाठी अर्जही करता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही ठरल्या वादग्रस्त
कविता नावंदे यांनी एका विद्यार्थिनीला लाख रुपयांची रक्कम मागितल्याचा प्रकारही घडला होता. तर एका महिलेकडून तीन लाखांचे हापूस आंबे मागवून पैसे न दिल्याचा प्रकारही घडला होता. ती रक्कम मागणाऱ्या महिलेलाही मारहाण केल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस ठाण्यात दाखल होती.

Web Title: Bribed Parbhani District Sports Officer Kavita Navande sent to 14 days judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.