ट्रॅक्टर- टेम्पोच्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:56 IST2024-12-21T11:55:37+5:302024-12-21T11:56:01+5:30
पाथरी-आष्टी रस्त्यावर अपघात मालिका सुरूच; ट्रॅक्टर- टेम्पोच्या समोरासमोर धडकेत टेम्पोतील एक गंभीर जखमी

ट्रॅक्टर- टेम्पोच्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा, एकजण गंभीर जखमी
- विठ्ठल भिसे
पाथरी : ऊस वाहतूक करणार ट्रॅक्टर आणि टेम्पोची वडी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता झाली. या अपघातामध्ये टेम्पोमधील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे. धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. ट्रॅक्टरचे तर हेड तुटून पडले आहे.
शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी -आष्टी रस्त्यावर ट्रॅक्टर ( एम एच 44 डी 2976) पाथरी येथून ऊस घेऊन जात होता. याच वेळी आष्टीकडून एक टेम्पो ( एमएच 21 एक्स 2458) भरधाव वेगाने येत होता. वडी पाटीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. ट्रॅक्टरचे तर हेड तुटून बाजूला पडले.
दरम्यान, टेम्पोमध्ये आदित्य अशोक कोल्हे (22, रा आष्टी ) हा तरुण अडकून पडला. माहिती मिळताच पाथरी पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या गंभीर जखमी आदित्य यास बाहेर काढले. त्याच्यावर पाथरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यास अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले.
पाथरी-आष्टी रस्त्यावर अपघात मालिका सुरूच
पाथरी ते आष्टी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडेझुडपे रस्त्यावर आली आहेत. काही ठिकाणी साईड पट्टीची कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दर आठ दिवसांत एक अपघात घडत आहे.