जन्म गुपचूप अन् मृत्यू थेट रस्त्यावर; नवजात अर्भक बसमधून फेकणाऱ्या दोघांवर खुनाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:37 IST2025-07-17T13:36:51+5:302025-07-17T13:37:25+5:30
पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटकेत करण्यात आली आहे.

जन्म गुपचूप अन् मृत्यू थेट रस्त्यावर; नवजात अर्भक बसमधून फेकणाऱ्या दोघांवर खुनाचा गुन्हा
- विठ्ठल भिसे
पाथरी (जि परभणी ): अर्ध्या तासापूर्वीच जन्मलेलं एक गोंडस बाळ सुसाट धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिलेलं काळसर निळसर कपड्यात गुंडाळलेला जीव. काही मिनिटांतच मृत्युमुखी पडले... ही गोष्ट कुठल्याही काल्पनिक कथेतली नाही, तर पाथरी- परभणी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी घडलेली वास्तवकथा आहे. 15 जुलैच्या पहाटे, पाथरी-सैलू रस्त्यालगत कॅनॉलच्या पुढे एक अर्भक धावत्या ट्रॅव्हल मधून रस्त्यावर फेकलं गेलं, याच ठिकाणाहून जाणाऱ्या काहींनी पाहिलं तेंव्हा ते मृत होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालात डोक्यावरील गंभीर मारामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे हत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कोण आहेत आरोपी?
या प्रकरणात दोन आरोपी ऋतिका मिलिंद ढेरे आणि तिचा तथाकथित पती अल्ताफ मेहनुद्दीन शेख (रा. परभणी) – यांच्यावर सुरुवातीला पाथरी पोलीस ठाण्यात अर्भक विल्हेवाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण वैद्यकीय अहवाल, घटनास्थळ आधारे पोलिसांनी त्वरित भारतीय दंड विधान कलम 103 (1) (खून) अंतर्गत गुन्हा वाढवला. अल्ताफ शेखला पोलिसांनी पहिल्या दिवशी ताब्यात घेऊन चौकशी करून नोटीस वर सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि प्राथमिक मेडिकल रिपोर्टच्या आधारे चौकशीनंतर त्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृत अर्भकाच्या डीएनए तपासणीसाठी रिपोर्ट पाठवला आहे. अर्भकाच्या मातृत्व-पितृत्वाचा वैज्ञानिक पुरावा लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. मृत अर्भक याची मेडिकल तपासणी आणि डी एन ए तपासणी करण्यात आल्या नंतर ते अंत्यसंस्कारासाठी मातेच्या ताब्यात देण्यात आलं आहे , ही माता परभणी येथे रुग्णालयात उपचार घेत आहे
माणुसकीला हादरवणारा प्रकार
पाथरीत काल जे घडलं, ते फक्त एका अर्भकाचं नव्हतं... ही घटना पाथरी परिसरात घडली एवढाच या भागाचा संबंध. तथाकथित पती पत्नी हे दोघे मूळ परभणीतील दीड वर्षांपासून ते पुणे चाकण येथे वास्तव करत होते. याच दरम्यान गर्भधारणा झाली. समाजापुढे बाळ कस आणावे म्हणून त्या निर्दयी आईने शेवटच्या क्षणात बाळ पोटात घेऊन ट्रॅव्हल बसने पुणे ते परभणी प्रवास केला, मात्र बाळ वाटेतच जन्मल. सकाळी पाथरी परिसरात बसमधून बाळ अमानुषपणे फेकून दिल. मात्र, एका जीवाला जगण्याचा हक्कच मिळू नये, यासाठी त्याचा जन्म गुपचूप, आणि मृत्यू थेट रस्त्यावर? हे त्या मातापित्याच कृत्य निसर्गाला मान्य नव्हत, म्हणूनच लगेच छडा लागत आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेत खुनाचे कलम वाढ झाल्याने तपास आता पोलीस निरीक्षक महेश लांडगे करत आहेत.