अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:55 IST2025-07-01T12:46:59+5:302025-07-01T12:55:01+5:30
या सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे.

अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच
परभणी : जिल्ह्यातील काही दिग्गज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षांतर करणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. अखेर जिंतूरचे माजी आ. विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मात्र, त्यांच्या आधीपासून चर्चेत असलेले पाथरीचे माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा प्रवेश लटकलेलाच आहे.
परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. राजेश विटेकर हे जिल्हाध्यक्ष या नात्याने व्यक्तिश: लक्ष घालून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांत जि.प., पं.स. व न.प.च्या दृष्टीने दिग्गजांना पक्षात प्रवेश दिला. आता जिंतूर विधानसभेत आणखी एका दिग्गजाचा प्रवेश होणार आहे. यापूर्वीच वंचितकडून लढलेले सुरेश नागरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत काही माजी जि.प.सदस्य आले आहेत. आता माजी आ. विजय भांबळे हे १ जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भांबळे यांच्यासमवेत जि.प.तील काही माजी पदाधिकाऱ्यांसह जि.प. सदस्य, नगरसेवक पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांनी ऐनवेळी गुगली
या सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे. दुर्राणी यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाथरी दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा कार्यक्रम झालाच नाही. पक्षांतराच्या रांगेत दुर्राणीही असून त्यांचा नंबर कधी येणार, हे कळायला मार्ग नाही. अजित पवारांनी ऐनवेळी गुगली टाकत कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.