ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:36+5:302021-09-15T04:22:36+5:30
तरुण-तरुणी कोरोनाच्या काळापासून सर्व माहितीची देवाणघेवाण तसेच शिक्षण, नोकरी यासाठी आपली खासगी माहिती वेगवेगळ्या सोशल मिडीया माध्यमावर टाकत असते. ...

ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
तरुण-तरुणी कोरोनाच्या काळापासून सर्व माहितीची देवाणघेवाण तसेच शिक्षण, नोकरी यासाठी आपली खासगी माहिती वेगवेगळ्या सोशल मिडीया माध्यमावर टाकत असते. जोडीदार पाहणे व शोधणे ही कामे सुध्दा आता वेबसाईटस तसेच वैयक्तिक माहितीच्या आधारे केली जात आहेत. पालकांची सुध्दा यास संमती आहे. यातून आपला फोटो, ई-मेल, गोपनीय माहिती कोणाच्या हाती पडतेय, तसेच तिचा वापर कशासाठी कोण करतोय, याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
अशी होऊ शकते फसवणूक
१) ऑनलाईन वेबसाईटस ज्या काही सुरु आहेत. तेथे सर्व माहिती टाकताना त्या अधिकृत आहेत की नाही, याची तपासणी करावी. अनेक जण खोटे फोटो किंवा प्रोफाईल तयार करुन तुम्हाला वेगवेगळ्या साईटचा वापर न करता वैयक्तिक सोशल मिडीयावर मैत्रीचा अर्ज करतात. यात लगेच मोबाईल व इ-मेल याची माहिती घेतली जाते. मग मोबाईलवर सतत संपर्क करुन मैत्री वाढविली जाते. यानंतर तुमची ओळख वाढल्यावर प्रोफाईल डिलीट करुन टाकले जाते. यानंतर मग तुमच्याशी जवळीक साधून अडचण असल्याचे खोटे कारण देत पैसे मागितले जातात. यातून तुमची फसवणूक होते.
ही घ्या काळजी
मँट्रीमोनी साईट वगळता अन्य कोणाशी लग्नाच्या अनुषंगाने माहिती शेअर करतोय, त्यांनी कधी पैसे पाठविण्याची विनंती केल्यास ते पाठवू नयेत. तसेच कोणालाही ऑनलाईन माहिती सादर करु नये. भेटायला बोलावल्यास सार्वजनिक ठिकाणी भेटावे, तेही घरातील सदस्यांना याची कल्पना द्यावी. अनेकदा भेटण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते.
कोरोनानंतर ऑनलाईन जोडीदार शोधमोहिम
कोरोना झाल्यापासून अनेक मुला-मुलींकडून ऑनलाईन जोडीदार शोधण्याला प्राधान्य दिले जात आहे. यात आपल्या माहितीच्या आधारे फसवणूक करणारे समोरील गरजू, विधवा तसेच तुमची गोपनीय माहिती घेऊन संबंधिताला पैशाची मागणी करुन फसवता, येते का ? याची शहानिशा करुन मगच वैयक्तिक संवाद साधतात. यात खोटे नाटक करुन मग पैशाची मागणी करतात. ही पध्दत आता वाढली आहे.