प्रशासनाकडे उपलब्ध नाही जुन्या खत साठ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:05+5:302021-05-20T04:18:05+5:30

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागच्या दोन दिवसांपासून मोंढा ...

Administration does not have information on old manure stocks | प्रशासनाकडे उपलब्ध नाही जुन्या खत साठ्याची माहिती

प्रशासनाकडे उपलब्ध नाही जुन्या खत साठ्याची माहिती

Next

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागच्या दोन दिवसांपासून मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. यावर्षी खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिल्लक असलेला जुना खत साठा जुन्याच दराने विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यात जुन्या खताचा किती साठा उपलब्ध आहे, तो कोणाकडे आहे, याविषयीची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. वारंवार ही माहिती मागवूनही उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे जुन्या खताची माहितीच नसेल तर त्याविरुद्ध कारवाई कशी करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत सर्रास जुने खत नवीन दराने विक्री केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी खताच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने जुना खत साठा किती आहे? आणि तो कुठे उपलब्ध आहे? त्याची माहिती जाहीर करावी आणि जुन्याच दराने या खताची विक्री होईल, या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खताची कृत्रिम टंचाई

येथील बाजारपेठेत आतापासूनच खताची कृत्रिम टंचाई केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे शेतकर्‍यांना हवे असलेले खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आतापासूनच खताची साठेबाजी करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. तेव्हा कृषी विभागाने याबाबतही तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

१ लाख १७ हजार मे. टन आवंटन मंजूर

जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यातून एप्रिल महिन्यामध्ये १ लाख १७ हजार ८८० मे. टन आवंटन मंजूर करण्यात आले. १ एप्रिल रोजी जिल्ह्यामध्ये १४६५० मे. टन खत उपलब्ध होते. १ ते १५ एप्रिल या काळात २४ हजार २६० मे. टन खताचा पुरवठा करण्यात आला. उपलब्ध असलेल्या ३८ हजार ९१० मे. टनांपैकी १३८४ मे. टन खताची विक्री झाली. सध्या ३७ हजार ६५२ मे. टन खत शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली आहे.

Web Title: Administration does not have information on old manure stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.