नैसर्गिक शेतीतील क्रांतीची दखल! परभणीच्या शेतकरी अरुणा थोरेंची युरोप दौऱ्यासाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:21 IST2026-02-06T16:20:20+5:302026-02-06T16:21:23+5:30
मातीशी नातं आणि आकाशाला गवसणी! स्वित्झर्लंड, जर्मनीसह चार देशांच्या अभ्यास दौऱ्यासाठी अरुणा थोरेंची निवड

नैसर्गिक शेतीतील क्रांतीची दखल! परभणीच्या शेतकरी अरुणा थोरेंची युरोप दौऱ्यासाठी निवड
सेलू (जि. परभणी) : वालूर येथील संभाजी सोनवणे यांची लेक अरुणा भुजंग थोरे हिने जिद्द आणि कष्टाने देवनांद्रा (ता. पाथरी) येथे नैसर्गिक शेती विकसित केली. याची दखल घेऊन राज्य शासनाच्या शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौऱ्याच्या पुरस्कृत योजनेंतर्गत युरोपियन खंडातील प्रगत शेती व दुग्धव्यवसाय असलेल्या स्वित्झरलँड, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी या चार देशांतील आधुनिक शेती, तंत्रज्ञान व फळप्रक्रिया अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
हा दौरा १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून त्यांना पत्र मिळाले आहे. याबद्दल अरुणा थोरे यांचा वालूर ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ४) सत्कार केला आहे. देवनांद्रा येथे नवीन तंत्रज्ञान व नैसर्गिक शेतीतून आंबा, केळी, रामफळ, ऊस, लिंबू, पपईसह उत्कृष्ट उत्पादने घेणाऱ्या अरुणा भुजंग थोरे यांनी साहीवाल व कंधारी देशीगाय संवर्धन, दुग्धव्यवसाय, गांडूळ खतनिर्मिती व मधमाशी पालन वाढवले आहे. उत्पादनांची गुणवत्ता, आकर्षक पॅकिंगद्वारे ग्राहकांची पसंद मिळवली. ग्रामीण महिलांसाठी त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. या प्रगतिशील शेतीमुळे जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या अरुणा थोरे यांची राज्य कृषी विभागाने दखल घेतली आहे. थोरे ह्या परभणी जिल्ह्यातून पहिल्या महिला शेतकरी देशाबाहेरील शेती व दुग्ध व्यवसाय अभ्यासासाठी जात आहेत.
युरोप खंड दौऱ्यातून प्रगत चार देशांतील आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धोत्पादन व फुलोत्पादनाचा अभ्यास होईल. विशेषतः रसायनरहित फळे-भाज्या प्रक्रिया करून दीर्घकाळ टिकवण्याचे तंत्र शिकून शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करण्याचा मानस आहे.
- अरुणा भुजंग थोरे, देवनांद्रा