४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:41 IST2025-02-07T14:41:08+5:302025-02-07T14:41:26+5:30
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
परभणी : घराच्या शेजारी खेळणाऱ्या ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एफ. एम. खान यांच्या न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी सुनावली.
परभणी तालुक्यातील दैठणा पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये पीडितेच्या आजीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामध्ये आरोपी स्वप्निल उर्फ राजू भगवान ताकट (२५) याने मोबाइल देऊन लहान मुलीला बाथरूममध्ये नेले. त्या ठिकाणी अश्लील चाळे केले. यावेळी मुलीची आजी त्या ठिकाणी आली असता आरोपी काही न बोलता त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र ही लहान मुलगी रडत असल्याने घरच्यांनी तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिम्पलवाड यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि पीडिताची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी स्वप्निल उर्फ राजू ताकट याला भादवी कलम ३७६ अन्वये दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपयांचा दंड, त्याचबरोबर कलम ३७६ (अब) भादवी अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंड, कलम ४ पॉक्सो अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, कलम ८ पॉक्सो अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली. त्याचबरोबर सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेश केला. तसेच दंडाची रक्कम ९ हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेशित केले. या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड. ज्ञानोबा दराडे, सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा चावरे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पैरवी अमलदार प्रमोद सूर्यवंशी, मपोह मंगल साळुंके, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.