सासुरवाडीतील नवजात लेकीचा लळा लागला, मध्यरात्री भेटीस निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:13 IST2025-04-10T14:12:34+5:302025-04-10T14:13:15+5:30
पाथरी ते पोखरणी रस्त्यावर मंगरूळ बुद्रुक शिवारात झाला अपघात

सासुरवाडीतील नवजात लेकीचा लळा लागला, मध्यरात्री भेटीस निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू
मानवत ( परभणी): माहेरी असलेल्या बाळंत पत्नीला आणि नवजात मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या दुचाकीवरील तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मानवत तालुक्यातील पाथरी पोखरणी रस्त्यावर मंगरूळ (बु.) शिवारात गुरुवारी पहाटे 3 वाजता घडली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शेख अल्ताफ शेख सलीम (25, रा. रुमना जवळा ता.गंगाखेड) यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. दोन आठवड्यापूर्वी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. एक दोन वेळेस ते पत्नी आणि लाडक्या लेकीला भेटायला गेले. दरम्यान, नवजात लेकीचा लळा लागल्याने तिला भेटण्यासाठी रूमना जवळा येथून गुरुवारी पहाटे शेख अल्ताफ शेख सलीम हे दुचाकीवरुन (क्रमांक एमएच 22 बीए 3036) मानवतच्या दिशेने निघाले.
मात्र, पहाटे 3 वाजेच्या सुमारास पाथरी ते पोखरणी रस्त्यावर मंगरूळ बुद्रुक शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेख अल्ताफ शेख सलीम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स पो उ नि भारत नलावडे, महेश रनेर यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारी 1 वाजता शवविच्छेदन करण्यात आले.