रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली; एकाच्या जागीच मृत्यूनंतर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:27 IST2023-04-18T17:26:53+5:302023-04-18T17:27:13+5:30
दोन तरुणांनी अपघातात जीव गमावल्याने खरबा गावावर शोककळा पसरली आहे.

रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली; एकाच्या जागीच मृत्यूनंतर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
मानवत (हिंगोली) : मानवत - मानवतरोड राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घडली होती. दरम्यान, गंभीर जखमी 32 वर्षीय तरुणाचा 17 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तालुक्यातील खरबा येथील रामा देविदास निर्मळ (वय 28) आणि श्रीराम नामदेव निर्मळ (वय 32) हे दोघे दुचाकीवर ( क्रमांक एम एच 12 पी एम 3969 ) मानवतकडून आपल्या खरबा गावाकडे निघाले होते. राधेश्याम जिनींग समोर महामार्गावर एक ट्रॅक्टर उभे होते. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकली. यात रामा देविदास निर्मळ याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी श्रीराम निर्मळ याच्यावर परभणी नंतर नांदेड येथे उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी रात्री 8 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी खरबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात आई,पत्नी, दोन मूले असा परिवार आहे. दोन तरुणांनी अपघातात जीव गमावल्याने खरबा गावावर शोककळा पसरली आहे.