सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:36 IST2023-05-12T13:35:57+5:302023-05-12T13:36:37+5:30
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचातांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला.

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश
सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शेत शिवारात मारोती दगडु राठोड यांच्या आखाड्यावर सेप्टिक टँक सफाईचे काम करताना गुरुवारी ( दि ११) रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान गुदमरुन पाच मजुरांचा मृत्यू झाला. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटना दुर्दैवी आणि दु:खदायक आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
सोनपेठ (जि. परभणी) शहराजवळील भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १०…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 12, 2023
दरम्यान, सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात मारोती राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांचे फॉर्महाऊस आहे. येथील सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी विठ्ठल राठोड यांनी सोनपेठ शहरातील सफाई कामगारांना बोलवले होते. गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान सहा मजूर फॉर्महाऊस वर हजर झाले. सफाई सुरू असताना रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान एकजण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी एकेक करून इतर पाच जण आत गेले. मात्र कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला. राठोड तिथे आले पण तोपर्यंत उशीर झाला होता. माहिती मिळताच सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने टँकवरीस स्लॅब फोडण्यात आला. त्यानंतर गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता.