5 crore fund received for health center in Parbhani city | परभणी शहरातील आरोग्य केंद्रासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त

परभणी शहरातील आरोग्य केंद्रासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी पाठविली होती शासनाकडे फाईलरुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अधांतरित

परभणी : शहरात ६० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला वितरित केला आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.

परभणी शहरात सध्या कल्याण मंडपम् येथे महानगरपालिकेचे रुग्णालय आहे. तसेच ६ ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चालविले जाते. या केंद्रांमधून शहरातील रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, यापैकी एकाही रुग्णालयात रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे शहराची आरोग्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य केंद्र असावे, असा प्रस्ताव २०१८ मध्ये मांडण्यात आला. महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी या संदर्भातील प्रस्ताव तयार केला होता. त्यात ५ कोटी रुपये खर्चाच्या ६० खाटांच्या आरोग्य केंद्राबरोबरच शहरातील आरोग्याच्या संदर्भात इतर प्रस्ताव तयार केले होते.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी, महानगरपालिकेची स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब तसेच फिजिओथेरपी सेंटर असा ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सी.टी. स्कॅन मशीन, औषधी आणि इतर वैद्यकीय साहित्याचाही समावेश करण्यात आला होता. हा ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि ६० खाटांच्या आरोग्य केंद्राचा ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मागील महिन्यात मंजुरी मिळाली असून, ५ कोटी रुपयांचा निधीही महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहरात लवकरच अद्ययावत असे ६० खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.


रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अधांतरित
शहरात ६० खाटांचे रुग्णालय उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आणि रुग्णालयासाठी निधीही उपलब्ध झाल्याने आता रुग्णालय उभारणीच्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र हे रुग्णालय उभारणीसाठी जागेचा प्रश्न कायम आहे. या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. रुग्णालय उभारणीसाठी किमान १ एक्कर जागा आवश्यक आहे. त्यामुळे सध्या तरी या रुग्णासाठी जागेचा शोध सुरू आहे. जागा उपलब्ध  झाल्यास पुढील प्रक्रियेला गती मिळणार असल्याने  जागेचा प्रश्न मनपा प्रशासनाने तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे.


इतर प्रस्ताव प्रलंबितच
२०१७-१८ या वर्षात महानगरपालिकेने शहरातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार केले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालय, सी.टी. स्कॅन मशीन, फिजिओथेरपी सेंटर आणि आरोग्य प्रयोगशाळेचा समावेश आहे. सध्या निर्माण झालेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेने या सुविधा उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला तर त्यासही मंजुरी मिळू शकते. त्यामुळे शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊन जिल्हा रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.


सुविधा वाढविण्यास वाव मिळणार 
शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी २०१७-१८ मध्ये ६० खाटांचे रुग्णालय आणि इतर प्रस्ताव तयार केले होते. त्यात ६० खाटांच्या रुग्णालयाचाही समावेश होता. या रुग्णालयास मंजुरी मिळून निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहरात आरोग्य सुविधा वाढविण्यास आता वाव मिळणार आहे. या रुग्णालयासाठी कल्याण मंडमप्, सुपर मार्केट किंवा जिल्हा स्टेडियम मैदानासमोरील लेडीज क्लबची जागा पर्याय ठरु शकतो. मनपा प्रशासनाने आता जागेविषयी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
-सचिन देशमुख, माजी आरोग्य सभापती.

Web Title: 5 crore fund received for health center in Parbhani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.