वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:22 IST2023-10-17T15:20:28+5:302023-10-17T15:22:19+5:30
ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा
परभणी : देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे बंजारा समाज या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा समाज ऐन सणासुदीच्या काळात घरादारापासून दूर राहून ऊसतोडी करतो. गेल्या वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या बांधवांचे कुटुंब सुरळीत चालण्यासाठी त्यांना जीवन विमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे, आश्वासन पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथे सोमवारी गोर सेनेतर्फे ऊसतोड कामगार महामेळावा घेण्यात आला. या प्रसंगी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, कर्नाटक गोरसेनेचे रविकांत बागडी, गोदावरीचे सरपंच नामदेव पवार आदी उपस्थित होते. ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
ऊसतोड कामगारांना आरोग्य, सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हिताचे लवकरच निर्णय घेण्यात येतील. राज्यात बंजारा समाजाच्या मुलांसाठी ८२ निवासी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतही लवकरच वसतिगृहे सुरू करणार असून, ऊसतोड कामगारांच्या इतरही मागण्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास मंत्री राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, अरुण चव्हाण समाजबांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी गोर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.