- अवंती कुलकर्णी
आता आषाढाला सुरुवात झालीच आहे. खरं तर आपल्याकडं किती महत्त्व आहे या महिन्याला ! आषाढ महिना येतो तोच सुरेख असा पाऊस घेऊन. आणि उन्हाच्या झळांनी झळून मलूल, अचेतन झालेल्या सा:या सृष्टीला, आसमंताला अक्षरश: सचेतन करून टाकतो. पाऊस, त्यामुळं होणारे निसर्गातले, वातावरणातले बदल हा तर कवी लोकांचा, लेखकांचा हक्काचा विषय. तर माङयासारख्या सामान्यांचाही तितकाच जिव्हाळ्याचा विषय. पाऊस म्हटलं की, प्रत्येकालाच कुठली ना कुठली आठवण अगदी प्रकर्षानं येत राहते, मग ती व्यक्तीची, प्रसंगाची, गाण्याची, कवितेची, खाण्याची किंवा इतर कशाचीही असू शकते.मलाही पावसाळ्यात आमच्या जुन्या घराची फारच आठवण येते. आमचं जुनं घर म्हणजे थोरलं घर नव्हे. फ्लॅटमध्ये राहायचो ते घर. माझं सर्वात आवडतं घर. छोटंसं; पण बेस्ट होतं. आमच्या घराच्या मागं शंभरभर पावलांवर रंकाळा होता, एका बाजूला प्रचंड मोठं असं उसाचं शेत होतं, आणि घराच्या समोर मोठंच्या मोठं मैदान होतं. गंगावेश घराजवळ असल्यानं दूधकट्टय़ासाठी जाणा:या येणा:या म्हशी दिवसरात्न घरासमोरून जायच्या. त्याच्या घंटांचा आवाज सतत कानावर पडत असे. पावसाळ्यात मात्न समोरच्या ग्राउण्डावर दिवसभर पाण्यात चिखलात मोठय़ा मुलांचं फुटबॉल खेळणं सुरू असायचं आणि खेळताना त्यांचं एकमेकांना हाका मारणं, बोलणं वगैरेही समोर घरात ऐकू येई आणि रात्नभर बेडकांचं बोलणंही ऐकू येई. त्यात भरीस भर रातकीडेही असत. कधीतरी उसातून मोरसुद्धा रियाज करत असत वगैरे.म्हशींची, दिवसभर गलका करणा:या मुलांची, रातकीडय़ांची आणि बेडकांची प्रचंड सवय झाली होती. इतकी की नवीन घरी राहायला आल्यानंतरच्या पहिल्या पावसाळ्यात मला जगभरातून बेडकांचा नायनाट झालाय की काय असं वाटून कॉलेजच्या लॅबमधून पीसीवरून गुगल करून खरोखर चेक केलेलं बेडकांच्या अस्तित्वाबद्दल. मग पाऊस संपता संपता आमच्या बागेत एक बारका टोड बघितला आणि जिवात जीव आलेला.पावसाळ्यांत जेव्हा जेव्हा मैदानात पाणी साठून राहिलं तेव्हा तेव्हा अंधार पडला की पाणी चमकायचं, पाण्यावर पिवळट हिरवट तवंग असायचे. आणि अजून जास्त अंधार पडला की मग पाण्यातून बेडकांचं समूहगाणी, गोलमेज परिषद, संसद वगैरे सगळंच भरत असे एकाचवेळी. लहानपणी चमकणारं पाणी बघून काहीतरी गूढ अर्तक्य वाटलेलं पण काही दिवसांनी ते बेडकांचे डोळे आहेत हे लक्षात आलेलं.दहावीत बारावीत असताना लवकर उठून अभ्यासाला बसायचे तेव्हाही पाऊस, बेडूक आणि म्हशी हे तिघं असायचे सतत.पाऊस म्हटला की, मला आणखी एक गोष्ट आठवते ते म्हणजे घराची मोठी खिडकी आणि खिडकीत बसलेली मी. बाजूला टेपवर आवडीची गजल नाहीतर उस्ताद अमीर खाँसाहेबांचा मेघ राग. मग आठवते शंकर रामाणींची एक सुरेखशी कविता.
‘बाहेरच्या बहर-बरसत्या पावसाची धिमी धूतवसत्नाची लयअमीरखाँच्या बुलंद अत्तरसुगंधी आवाजीला सहजपणो समांतर.वाटतेय पाकळी अन् पाकळी उमलते.. पाझरतो प्रसन्न चांपेगर्द दर्वळ निएकरूप एकाकार होतो आपसूक माङया नसानसांत तालबद्ध मौनातचझंकारणा:या अदृश्य नादनिमग्न तारांशी.. एक अगम्य चैतन्य-मोहर!मग नकळत खाँसाहेब अल्लाद शिरतात मध्य-द्रुतलयीच्या दळदार दरबारात..मागोमाग मी तरारत्या तंद्रीच्या सलील प्रकाशात संपूर्ण हरवलेला..
मलमली स्वरांची पश्मिनी शाल माङया अंगा-खांद्यावर..बंद दाराच्या फटीतून निसटतो खोलीत एक स्वच्छ सूर्यकिरण काळचिंब अंतर्बाह्य..’
आणि मग कधीकधी मला याही कशाची गरज पडतच नाही. कारण आषाढातला पाऊस म्हणजे उन्हांची सांगता होऊन समेवर सरी पडणा:या पावसाची लयकारीच असते. आणि एकेका दिवशी हा पाऊस इतका सुरेल असतो की कुठली, गाणी, गजल, रागदारी न ऐकता फक्त आणि फक्त पाऊस ऐकत पहात बसावं अन् कुठेतरी आपली तंद्री लागावी. आणि अशा पावसाची अनुभूती घेत असताना मग आपलीही अवस्था रामाणींच्या कवितेतल्या सारखी होते. पावसाच्या स्वरांची मऊ मखमली शाल लपेटून घेऊन आपलं शरीरमन काही काळासाठी शांत होऊन जाते.कसा असतो नाही का हा पाऊस ! एकाचवेळी आपल्याला काही मजेशीर घटना आठवून देतो तर एकाचवेळी अंतर्मुख करून टाकतो.दरवर्षी पाऊस आणि शाळा एकदमच सुरू होतात. मग शाळेच्या वह्यापुस्तकांबरोबर रेनकोट, छत्नी, खरेदी किंवा डागडुजी असतेच. शाळेतून घरी परतताना आईवडिलांची नजर चुकवून भिजणं, रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यात उडय़ा मारणं, मित्नमैत्रिणींबरोबर दंगामस्ती करणं, हे असे उद्योग बहुतेक सा:यांनी केले असतात, करत असतात. रस्त्यावर साचलेलं पाणी शेजारून जाणा:या गाडीमुळं आपल्या अंगावर उडून नये म्हणून चारलेली कसरत, तर चप्पल, सॅण्डलमुळे ड्रेसवर चिखळ्या उडू नयेत म्हणून स्वत:ला सावरत चालायची खटपट, रेनकोट, छत्र्या, रिक्षा, गाडय़ा, सायकली ओल्या रस्त्याला झाकून टाकणार पण त्यातूनही पाऊस अन् ओला रस्ता आपलं अस्तित्व दाखवून देणार.मोठी सर आली की कुठेतरी आडोशाला, दुकानाच्या वळचणीखाली वगैरे उभं राहून ती सर कमी व्हायची वाट पहात अनोळखी लोक पावसामुळं क्षणभरासाठी जोडले जातात. कमी-अधिक फरकानं असाच असतो नाही पावसाळा दरवर्षी ! या वर्षीचा पावसाळा कसा असेल? कोरोनाच्या भयामुळं मुलं, लेकरं, मोठी माणसं, पावसात येतील? कटिंग चहा अन् वडा भजीच्या शेअर प्लेट्स तशाच असतील पडून दुकानात? कणीसवाले कुणीतरी येईल का म्हणून वाट बघत असतील?रस्त्यावरच्या खड्डय़ांमधलं सतत ढवळून निघणारं पाणी निश्चल निपचित असेल ना? छत्र्या, रेनकोटची गर्दी दिसेल आपल्याला? पाऊस करो अन् सगळं पूर्ववत होवो, बसं इतकंच वाटतंय या पावसाळ्यात..