काजलची आई

By admin | Published: June 22, 2017 08:07 AM2017-06-22T08:07:11+5:302017-06-22T08:07:11+5:30

आपला डोंबारी खेळ पाहून घटकाभर मनोरंजन झाल्याचा मोबदला मागणाऱ्या त्या सात वर्षाच्या पोरीला मात्र पाहणाऱ्यांकडून किडूक-मिडूक पैसा मिळायचा आणि सोबत भरपूर हेटाळणीही.

Mascara's mother | काजलची आई

काजलची आई

Next

 - हिनाकौसर खान-पिंजार

उंच दोरावर काठीने तोल सावरत चालणारी.. शरीराचं मुटकुळ करून एका छोट्याश्या रिंगमधून बाहेर पडणारी.. पटापट काठी फिरवणारी.. पाठीवर उलटं होऊन चालणारी.. उड्या मारणारी आणि मग लोकांसमोर हात पसवणारी...
आपला डोंबारी खेळ पाहून घटकाभर मनोरंजन झाल्याचा मोबदला मागणाऱ्या त्या सात वर्षाच्या पोरीला मात्र पाहणाऱ्यांकडून किडूक-मिडूक पैसा मिळायचा आणि सोबत भरपूर हेटाळणीही. एके दिवशी काठी फिरवणाऱ्या हातावर एका अवलीयानं पुस्तक ठेवलं. तिनंही ते मोठ्या खुबीनं धरलं, जणू हे पुस्तकच आपल्या भविष्याच्या दोरीवरचा तोल सांभाळेल या तोऱ्यात तिनंही पुस्तक हातात धरलं. आणि परिस्थितीशी झुंजत ही पोरगी आज दहावी उत्तीर्ण झालीय. 
काजल जाधव असं या मुलीचं नाव.

दिवाळीच्या-उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या कुटुंबाला आधार म्हणून एकीकडे डोंबाऱ्याचा खेळ, तर दुसरीकडे उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकाशी मेळ साधत काजलचा आता पुढील प्रवास सुरू झालाय. 
पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसरच्या अलीकडे एक छोटी वस्ती, वैदुवाडी गावठाण नावाची. काजलला भेटायला जायचं म्हणून मी दोन दिवसांपासून प्रयत्न करत होते. पण काजलच्या आई कमलाबाई जाधव यांना कामासाठी सकाळी सकाळीच बाहेर पडावं लागत असल्याने आणि रात्री उशिरा घरी येत असल्याने भेट मागे पडत होती. शेवटी अगदी सकाळी साडेसातची वेळ मुक रर करून आम्ही काजलच्या घरी पोहचलो. वैदुवाडी गावठाणात शिरल्यावर डावीकडच्या पहिल्या गल्लीतून घर विचारत आम्ही पोहचलो, तर समोरच काजलचं घर होतं. पत्र्याची दहा बाय पंधराची एक खोली. खोलीत जुजबी पण अतिशय चकचकीत भांडी, पलंग, दोन लाकडी खुर्च्या आणि असंच काहीतरी किडूक-मिडूक. या एवढ्याश्या घरात मुलाबाळांसह आठ-दहा माणसं राहतात. 
आम्ही घरात बसलो. गप्पा सुरू झाल्या. काजलला यंदा दहावीच्या परीक्षेत ४७ टक्के गुण मिळाले आहेत. या एवढ्याश्या मार्कांचं एवढं काय कौतुक असं वाटत कुणाला. तर थोडं थांबा.
हे खरंय, आजकाल ९०-९५-९९ अगदी १०० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांचा टक्का भरपूर वाढलाय. इतके मार्कमिळवूनही काहीजण आता आपलं पुढं कसं होणार, या चिंतेत उगीच रक्त आटवत असतील. पण आपल्या कमाईचं पारंपरिक साधन असलेला डोंबारी खेळ करून, हातावरच पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबातल्या काजलचं यश, तिची मेहनत, तिची झुंज आणि तिचे ४७ टक्के हेदेखील मोलाचेच आहेत.

काजल तिच्या शाळाप्रवेशाची गोष्ट सांगू लागली. 
‘ मी सात वर्षांची होते. आईसोबत डोंबाऱ्याचा खेळ करायला जायचे. रिंगमधून बाहेर यायचं, उड्या मारायचं, काठी फिरवायची असा खेळ सुरू होता. भटक्या- विमुक्तांसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे यांनी मला पाहिलं. विचारलं, शाळेत येणार का? मी हो म्हणाले. तसंही खेळ करताना शाळेत जाणारी मुलं दिसायची. त्यांचा गणवेश, त्यांचं दप्तर पाहून मलासुद्धा शाळेत जावसं वाटायचं. त्यामुळे मला कोणीतरी शाळेत नेणार म्हटल्यावर मला खूप आनंद झाला. चिंचवडच्या गुरुकुल शाळेत माझा प्रवेश झाला. तिथंच होस्टेलवर मी राहायचे. सुरुवातीला घरच्यांची खूप आठवण यायची. घरी जावंसं वाटायचं पण मग शाळाही आवडायची. हळूहळू रु ळायला लागले. चिंचवडच्या शाळेत जाण्याआधी घराजवळच्या अंगणवाडीत मी जात होते, त्यामुळे बाराखडी येत होती. ही नवी शाळाच मग आवडू लागली.’
काजलच्या कुटुंबात आईसह सहा बहीण-भाऊ. पण दोन भावांवर काळाने झडप घातली. आज चार भावंडं, दोन वहिन्या, भाचे असा मोठा कुटुंब कबिला आहे. भावंडांमध्ये काजल सर्वात धाकटी. आज तिला शाळेत जाताना पाहून तिच्या भावांची मुलंही शाळेत जात आहेत. आपल्या घरातील येणारी पिढी डोंबाऱ्याचा खेळ करणार नाही तर शिकून-सवरून पुढे जाईल हे आता साऱ्या कुटुंबानंच मनाशी पक्कं केलंय.
काजल शाळेतून उन्हाळी-दिवाळी सुटीसाठी घरी यायची. तेव्हा ती नेहमी आपल्या कुटुंबासोबत खेळ करायला जायची. जाणत्या वयात येऊ लागल्यावर तिला आपण जे करतोय त्याचं वाईट वाटू लागलं. ती सांगते, ‘आम्ही अख्खा खेळ दाखवेपर्यंत लोक पहायचे पण त्यांच्यापुढे हात पसरल्यावर ते आम्हाला हुसकवायचे. तुम्ही धडधाकट आहात, काम करा. भिका कशाला मागता, म्हणायचे. तेव्हा खूप वाईट वाटायचं. आम्ही आमच्या मजबुरीतून हे करतो. नंतर नंतर मला वाटायचं ज्या खेळापासून मुक्ती व्हावी म्हणून मी शिकतेय तर तेच काम दरवेळेसच्या सुटीत खेळायला लागतं. लोकांपुढे हात पसरावे असं नाही वाटायचं पण काय करणार?’ काजलच्या चेहऱ्यावर त्या धुतकारलेल्या भावनेची दुखरी कळ दिसतेच. पण तिच्या आईचं आता वय झालंय, त्यांना खेळ करता येत नाही म्हणूनही या छोकरीनं काहीवेळा एकटीनं खेळ केलेत. 
तुला कधी भीती नाही वाटली, इतक्या माणसांसमोर खेळ दाखवताना असं विचारलं तेव्हा काजलच्या आई कमलाबाईच म्हणाल्या, ‘हातावरची पोर होती तवापासनं खेळ करतेय. भीती कवाच मेली. हातावरची होती तेव्हा मी तिला घेऊन खेळायचे. गरगर फिरवायचे. उंच उडवायचे, तवापासून खेळतेय पोर.’ 
काजलची दहावी सुरू झाली तेव्हा कमलाबार्इंची खेळ करताना मणक्याजवळची एक नस दबली गेली. त्यांचा पाय उठेनासा झाला. कळ मणक्यातून मानेपर्यंत धावली. मुंग्या आल्या. मोठा बाका प्रसंग त्यांच्यावर ओढावला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम काजलच्या अभ्यासावरही झाला. आजारी आई म्हटल्यावर तिने धास्ती घेतली. त्याचा परिणाम निकालात दिसतोय असं तिच्या आई सांगत होत्या. 
काजलला पुस्तक वाचनाची आणि चित्रकलेची सुद्धा आवड आहे. तिने काढलेली काही चित्रे तिने दाखवली. तिचं सुंदर वळणदार अक्षरही तिने दाखवलं. यंदाच्या सुटीत वाचण्यासाठी तिच्याजवळ साने गुरुजींचं ‘धडपडणारी मुले’ हे पुस्तक होतं. काजल उत्साहाने म्हणाली, मला खूप सारे लेखक आवडतात. पुस्तक वाचायला खूप आवडतात. मी कविताही करते. पण आत्ता माझ्या कवितांची वही होस्टेलवर आहे. उत्तम कांबळेंचं ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक नुकतंच वाचून संपवलंय. 
काजल आता कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. पुढे नेमकं काय करणार हे निश्चित नाही. पण आपल्याला गुरुकुल येथील शिक्षक मार्गदर्शन करतील तसा निर्णय घेऊ असं ती प्रांजळपणे सांगते. मात्र आता शिकायचं, डोंबारी खेळ करून लोकांपुढे हात नाही पसरवायचं हे तिनं निश्चित केलंय. शिकूनच प्रगती होते हे तिला कळलंय. आपण शिकू आणि आपल्या कुटुंबातील बच्चेकंपनींनाही शिकायला सांगू हे ती ठासून सांगते.
शिकण्याचं मोल, तिच्याइतकं चांगलं कुणाला कळणार म्हणा..

काजलच्या आई तिच्याविषयी भरभरून बोलता बोलता एक विलक्षण गोष्ट सांगून गेल्या. काजल ही खरंतर कमलाबार्इंची पोटची मुलगी नाही. खेळ संपवून मिळालेल्या भाकरीतुकड्यावर कमलाबार्इंचं कुटुंब जेवण करत होतं त्यावेळेस एक बाई एका फडक्यात एका मुलीला घेऊन त्यांच्याजवळ बसली. ती भुकेली वाटली म्हणून कमलाबार्इंनी आपल्यातलं जेवण तिला देऊ केलं. नंतर ती बाई एकाएकी कमलाबार्इंना म्हणाली, ‘तुमच्या सहा मुलांमध्ये माझी पोरगी जड नाही जायची तुम्हाला आणि तिनं त्या पोरीला त्यांच्या मांडीवर ठेवलं. कमलाबार्इंनी आधी तिला समजावलं, अनाथाश्रमात दे असंही सुचवलं, पण त्या बाईनं ऐकलं नाही. ती त्या पोरीला सोडून निघून गेली. कमलाबाई सांगतात, ‘मांडीवर काजलला ठूलं तवा ती जगतेय का मरतेय अशा अवस्थेत व्हती. तिच्या हाताचा दंड करंगळीवानं व्हता आणि पोट हे मोठं टंबारलेलं, फुगलेलं होतं. तिला घेऊन दवाखान्यात गेले. जगली तर जगली म्हणत दोन दिवसांत ९ हजार रुपये खर्च केले. हळूहळू तिचं पोट हलकं झालं. मऊ झालं. मग त्यानंतर तिच्यासाठी शिवापूरच्या दर्ग्यात जाऊन दुआ केली. काजलला बरं वाटू लागलं. तवापासनं पोरीला कायपण झालं नाय. सोताच्या पोरांना मी शंबर रुपयेपण खर्च केले नाहीत पण या पोरीचा जीव लागला. तिला कदीबी काय बी कमी पडू दिलं नाय. लोकांकडूनच तिला कळलं, ही तुला सांभाळणारी आई हाय म्हणून. आधी तिला आपल्या सोताच्या आईनं असं का केलं म्हणून वाईट वाटलं पण नंतर नाय कधी काय म्हणाली.’ 
जिला आईची अशी माया मिळाली, ती जिद्दीनं पुढं चालणार नाही तर काय?

Web Title: Mascara's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.