- प्रज्ञा शिदोरे
आपण सगळेच हे सतत करत असतो. लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत. दुसऱ्याला दोष देणं. परीक्षेत कमी मार्क पडले तर- काय शाळेत काही नीट शिकवत नाहीत हो. एखादी भाजी करपली तर- अगदी तेव्हाच फोन आला, त्यानं असं झालं. निवडणूक हरलो तर- ईव्हीएम मशीन्समध्ये घोळ असणार! असं काहीही. दुसऱ्याला दोष दिला, स्वत:ला सेफ झोनमध्ये ठेवत आपण वेळ मारून नेतो. मारून नेण्यातच आपल्याला धन्यता वाटते. मोठमोठे मानसशास्त्रज्ञ आणि मॅनेजमेंट गुरूही म्हणतात की, आपली जबाबदारी ढकलून देता ना आपण, तेव्हा आपण आपल्या आयुष्यातून, स्वत:च्या नजरेतून उतरायला लागतो. आपण मग कधीच सत्याला सामोरं जाऊ शकत नाही. असं झालं तर आपण आयुष्यात काही मिळवूही शकत नाही. बेंजामिन हार्डी याने यासंदर्भात सुंदर लेख लिहिला आहे. यात तो म्हणतो की, जगात चार सत्य आहेत. १. निर्णय घेता न येणं ही समस्या तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. २. लोक सतत लटकलेल्या अवस्थेत असतात. त्यांना काय करायचं, आणि ते करण्यामागचा हेतू काय ते कळत नसतं. ३. कोणतीही मोठी गोष्ट घडण्याच्या अगदी आधी तुम्हाला सर्वात जास्त काळोख दिसेल. पुढे काही वाटच नाही असं वाटेल. ४. तुम्ही जेव्हा स्वत:च्या आयुष्याचे सारथी स्वत:च बनाल तेव्हा तुम्हाला तुमच्यातली खरी क्षमता बघायला मिळेल. बाकी अधिक समजून घेण्यासाठी वाचा- "What happens when you take control of your life"