इज इट ऑल अबाउट नंबर्स?

By मोरेश्वर येरम | Published: March 4, 2021 10:39 AM2021-03-04T10:39:29+5:302021-03-04T10:40:43+5:30

सोशल मीडियात इन्फ्ल्यूएन्सर म्हणून करिअर करायचं ठरवलं तर यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं? व्हायरल करण्याचं गिमिक की मेहनतीचं सातत्य?

Is it all about numbers lokmat knowledge forum with social media influencers | इज इट ऑल अबाउट नंबर्स?

इज इट ऑल अबाउट नंबर्स?

Next

- मोरेश्वर येरम
(मोरेश्वर लोकमत ऑनलाइनमध्ये कार्यरत आहे.)
moreshwar.yeram@lokmat.com

सोशल मीडियात इन्फ्ल्यूएन्सर म्हणून करिअर करायचं ठरवलं तर यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं? व्हायरल करण्याचं गिमिक की मेहनतीचं सातत्य?

सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. हे नाकारता येणार नाही. मागणी तसा पुरवठा या तत्वावर चालणाऱ्या सध्याच्या मार्केटिंग युगात युथफुल्ल जनरेशनच्या सर्व मागण्या सोशल मीडियाकडून पूर्ण होतात. व्हर्च्युअल जगाचं व्यावसायिक स्वरुपहंही आज प्रचंड वाढलं आहे. नंबर्स गेम, व्हायरल, फॉलोअर्स, ट्रोलर्स या सगळ्याबाबतीत अनेक प्रश्न तरुण यू-ट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सला पडतात. आपणही या जगात नाव कमवावं अशी आस असते. मात्र ते जग नेमकं कसं आहे, इथं फक्त आकड्यांचा खेळ चालतो का? या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी 'लोकमत नॉलेज फोरम'च्यावतीने एका खास वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. इज इट ऑल अबाउट नंबर्स?- असं या वेबिनारचं नाव होतं. 

लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणवीर अलाहबादिया (BeerBicepsGuy), मासूम मिनावाला (StyleFiesta), अभिराज आणि नियती (Abhi&Niyu, Following Love), निकुंज लोटिया (Be YouNick) आणि मालिनी अग्रवाल (MissMalini) या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सशी चर्चा केली. तरुण मुलं ज्यांच्यावर, ज्यांच्या शब्दांवर-स्टाइल आणि प्रेझेन्टेशनवर फिदा आहेत असे हे तरुण इन्फ्ल्यूएन्सर.

रुळलेलेच्या वाटेवरुन प्रवास करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची ओढ असणारे वेगळी वाट निवडून स्वत:ची वेगळी ओळख करणारे. 'सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर' हे अलिकडच्या काळात तयार झालेलं नव करिअर. सोशल सॅव्ही नेटकऱ्यांना तर या क्षेत्राबाबत अप्रूप आहे. 'लोकमत वेबिनार'च्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सशी संवादातही याच गोष्टींवर मनमोकळी चर्चा झाली की सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून यशस्वी कसं होता येईल? कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा? काय टाळायला हवं? 

समाज माध्यमा 'व्हायरल' का होते, फॉलोअर्स आणि लाइक्स-व्ह्यूजचे आकडे महत्वाचे असतात की नसतात, त्यापलीकडे काय महत्वाचं ठरतं हे सारं उलगडून सांगितलं. जसं सारं जग 'बॅक टू बेसिक्स' या जगण्याच्या मूळ वृत्तीकडे वळलं तसंच समाज माध्यमांनाही वळायला लागलं. मात्र या महामारीच्या काळातही एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे तुम्ही कोणथ्या प्रकारचा 'कॉण्टेण्ट' क्रिएट करता हेच जास्त महत्वाचं ठरलं. या चिअरफूल चर्चेतून मग काही यशाचे, काही टाळण्याचे टप्पे आणि काही जरूर शिकावीत अशी सूत्रं समोर आली. त्यातलीच ही काही निवडक सूत्र.

१. सातत्य हाच यशाचा मार्ग
आपला व्हिडिओ किंवा स्टोरी प्रचंड व्हायरल झाली म्हणजे आपण यशस्वी झालो असं होत नाही. व्हायरल होणं म्हणजे यश नसतं. हे यश तात्पुरता आनंद देतं. एका व्हिडिओला मिळालेलं यश पुढच्या वेळेसह कायम राखणं हे खूप कठीण काम आहे. सातत्य ठेवणं आणि नेहमी काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करणं हाच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरच्या यशाचा मार्ग आहे, यावर साऱ्यांचं एकमत दिसलं. व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा हे लक्ष्य ठेवून काम करण्यापेक्षा लोकांना माहीत नसलेली आणि तुम्हाला त्यात आवड असलेली माहिती जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायला हवा. 

सोशल मीडियावर सातत्य टिकवण्याचा देखील एक मार्ग आहे. पैसे कमावण्याच्या उद्देशानं जो या व्यासपीठावर येतो तो कधीच टीकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत पॅशनेट असणं महत्वाचं असतं. तुम्ही पॅशनेट असाल तरच सातत्यानं तुमच्याकडून व्हिडिओ केले जातात आणि तुमच्या चॅनलची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू राहते. यातूनच तुम्ही पुढे यशस्वी होता, असं मत 'बी यूनिक' निकुंज लोटिया उर्फ निक यानं व्यक्त केलं. हे माध्यम मत असलेल्या प्रत्येकाला 'आवाज' देतं, तो आवाज आणि व्यक्त करण्याची पॅशन हीच ताकद बनत जाते. 

२. 'नंबर्स गेम' घातक
आकडे महत्वाचे असलेल्या या जगात नक्की व्हायरल काय होतं  याचं काही सूत्र आहे का? त्यावर संवादात सहभागी सगळ्यांचंच म्हणणं होतं की, व्हायरल काय होईल किंवा होतं याच्या मागे पळण्यापेक्षा आपल्याला काय करावसं वाटतं ते केलं, तर इथलं यश टिकू शकतं. इथं प्रसिद्धी आधी मिळते आणि यश नंतर मिळतं. त्यामुळे व्हायरॅलिटी टिकवण्यापेक्षा सातत्य टिकवणं, आपला प्रभाव निर्माण करुन तो कायम ठेवणं हे जास्त महत्वाचं ठरतं. 'सातत्य' आणि 'नावीण्य' हे इथल्या यशाचं गमक आहे. ्व्हिडिओ व्ह्यूज म्हणजेच नंबर्सच्या मागे लागलं की तुम्हाला सोशल मीडियावर माणसं दिसत नाहीत. फक्त नंबर्स दिसू लागतात. नंबर्सच्या मागे धावण्यापेक्षा ज्या लोकांना तुम्ही कमावलंय त्यांना जपण गरजेचं आहे. यातून संवाद आणि विश्वासार्हता दोन्हीत वाढ होते. त्यामुळे नंबर्सपेक्षा प्रेक्षकांशी नाळ जोडून ठेवणं महत्वाचं वाटतं, असा मोलाचा सल्ला मालिनी अग्रवालनं दिला. तुमच्यातील टॅलेंटनुसारचं व्हिडिओ व्हायरल व्हायला हवेत. त्यामुळे काय होतं की तुम्ही आता पुढच्यावेळी काय नवं देणार याची लोकांमध्ये उत्कंठा वाढते आणि तरच व्हायरॅलिटीच्या पुढे यशातलं सातत्य दिसतं. 

३. नावीण्य आणि प्रयोगशीलता
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर हा एक इन्व्हेण्टरच असतो. तो डिजिटल माध्यमात काहीतरी नवं देत असतो. नवं जन्माला घालत असतो. यातून या माध्यमातील माहितीत भर पडत असते. सोशल मडिया इन्फ्ल्यूएन्सरनं प्रयोगशील राहायला हवं, अशा सल्ला मासून मिनावाला हिनं दिला. यावेळी अभि-नियू करत असलेल्या कामाचं उदाहरण तिनं दिलं. 

अभिराज आणि नियती त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून संवेदनशील विषयांवर माहितीपर्ण व्हिडिओ बनवतात. डिजिटलच्या ज्ञानभांडारात अभि-नियू यांनी एक वेगळी कॅटेगरी निर्माण करण्याचं काम केलंय. हेच गणित प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. ताज्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ करणं आणि ते एडिट करणं खूप कठीण काम आहे. व्हिडिओचं आऊटपूट आपल्याला दिसतं. पण ते तयार होण्यामागे प्रयोगशीलता दडलेली असते जी सहसा लोकांपर्य़ंत पोहोचत नाही, असा अनुभव रणवीरनं सर्वांसोबत शेअर केला. 

४. ट्रोलर्सचं काय करायचं?  
एखाद्या बहरलेल्या शेतावर टोळधाड पडल्यानं होत्याचं नव्हतं होतं. तसंच सोशल मीडियातील ट्रोलर्सचा जत्था तुमच्या व्हिडिओवर पाणी फेरण्याचं काम करत असतो. त्यामुळे ट्रोलर्सशी नेमकं कसं डील करावं याबाबतही सर्वांनी आपापले अनुभव शेअर केले. ट्रोलर्स हे वास्तवापासून पळ काढणारे लोक असतात, असं रणवीर सांगतो. ट्रोल करतायत ते तुम्ही केलेल्या कामावर कमेंट करतायत तुमच्यावर नव्हे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून आपलं एक वेगळं आयुष्य आहे आणि सोशल मीडियात आपण जे करतोय, आपण जो काही ब्रॅण्ड आहोत तो आपल्या कामाचा भाग आहे. या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या की ट्रोलर्सचा विषय सहजपणे सोडवता येतो, असं मासूम म्हणाली.

एखाद्या ट्रोलरच्या कमेंटमध्ये आपण गुंतून जात असू तर आपलं कुठंतरी चुकतंय हे लक्षात घ्यायला हवं. जेव्हा आपण एखाद्या ट्रोलरला उत्तर देतो. तेव्हा आपण आपल्या व्हिडिओवर कौतुकाच्या कमेंट्स केलेल्यांचा अपमान करत असतो. त्यामुळे ट्रोलर्सला अजिबात महत्व देऊ नये, असं मत निक आणि अभि-नियू यांनी मांडलं. 
 

'सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स'सोबतचे 'लोकमत वेबिनार' येथे पाहता येईल

Web Title: Is it all about numbers lokmat knowledge forum with social media influencers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.