शारजा-दुबईत IPL, मग शेन वॉर्न नावाचं वादळ आठवणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:59 PM2020-09-10T16:59:45+5:302020-09-10T17:08:31+5:30

13 सप्टेंबर, शेन वॉर्नचा वाढदिवस. आयपीएल शारजा-दुबईत खेळवली जात असताना वॉर्न-वादळ आणि तेंडुलकर आठवणारच.

IPL in Sharjah-Dubai, & Shane Warne.. a great leg spinner | शारजा-दुबईत IPL, मग शेन वॉर्न नावाचं वादळ आठवणारच!

शारजा-दुबईत IPL, मग शेन वॉर्न नावाचं वादळ आठवणारच!

Next
ठळक मुद्देवॉर्न नावाचं वादळ

-अभिजित पानसे

कटय़ार काळजात  घुसली सिनेमात सुरुवातीला एक वाक्य आहे, ‘कला ही राजश्रयाने वाढते. तानसेनसारख्या संगीत सम्राटालासुद्धा आयुष्याची आर्थिक बाजू संभाळण्यासाठी राजाश्रयाचा आधार घ्यावा लागला होता.’ क्रिकेटमध्येही लेग स्पिन अशी एक कला आहे जी टीमच्या राजाच्या म्हणजे कॅप्टनच्या आश्रयाने वाढते. 
लेग स्पिन ही कला म्हणजे क्रिकेटमधील सतीचं वाण. एकदा हा वसा घेतला की टाकता येत नाही. लेग स्पिनरला जितकी त्याची मनगटी जादू आवश्यक असते तितकीच वा किंबहुना जास्त हृदयात ताकद आवश्यक असते. यशस्वी लेग स्पिनर होण्यासाठी जिगर लागते. कारण त्याला बॅट्समनकडून मारदेखील मिळण्याची शक्यता जास्त असते. लेग स्पिनर हा संघाचा हुकमी एक्का असतो. हरलेल्या मॅचला जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात असते; पण ऑफ स्पिनरप्रमाणे सुरक्षिततेचा प्लॅन बी त्याच्याकडे नसतो. एक तर मारा अथवा मरा. म्हणून लेग स्पिनरला  आपल्या संघात जागा देणं, त्याला संपूर्ण पाठिंबा देणं हे महत्त्वाचं असतं. त्यासाठी तसाच मनाने सशक्त, सकारात्मक, आक्र मक कॅप्टन लागतो. लेग स्पिनरचा दिवस खराब असेल तर त्याला फार मार पडू शकतो. अशावेळी त्याचा आत्मविश्वास ढळू न देणं, त्याला संघात असुरक्षित न वाटू देणं हे कॅप्टनचं काम असतं. एकदा का हे जमलं, लेग स्पिनर आपल्या पूर्ण भरात आला की मग तो कॅप्टनला हरलेल्या मॅचेसही जिंकून देतो. लेग स्पिनर हा सर्वार्थाने मॅच विनर असतो. संरक्षण करणं हे त्याला माहीत नसतं, 
आक्रमण करणं एवढंच त्याला ठाऊक असतं.


नव्वदीच्या दशकाच्या आधीपासूनच क्रि केटमध्ये वेगवान बॉलर्सचा दबदबा होता. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलियाचा वेगवान तोफखाना विरु द्ध संघांची दाणादाण उडवत होता. अशावेळी क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियामध्ये एका कलाकाराचं आगमन झालं. जादूगार आपली हातचलाखीने जादूचे खेळ दाखवतो, तसा या ऑस्ट्रेलियन कलाकाराकडे जादू होती बोटांची व त्याला साथ होती मनगटाची. 
 त्या काळात सगळीकडे विशेषतर्‍ आशिया उपखंडाबाहेर तडाखेबंद आडदांड वेगवान बॉलर्सचा दबदबा असताना 
क्रिकेटच्या वेलीवर लेग स्पिनचं हे नाजूक कलाकुसर विविधरंगी असलेलं, पण मस्तीत फुल उगवलं होतं. 
हा लेग स्पिनचा जादूगार शेन वॉर्न 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरला होता.
आपल्या अद्भुत लेग स्पिनने त्याने क्रिकेट जगतावर हळूहळू राज्य करायला सुरु वात केली. एका परिपूर्ण लेग स्पिनरला आवश्यक असलेली सर्व आयुधं त्याच्याकडे होती. 
नेहमीचा लेग ब्रेक त्याच्या जोडीला बॅट्समनच्या डिफेन्सचा तोड त्याच्या दोन बोटांच्या टिचकीतून बाहेर येणारा फ्लिपर होता. बॉलिंग अ‍ॅक्शन वा वेगात काहीही बदल न करता पिचवर पडून वेगात येणारा हा फ्लिपर बॅट्समनच्या पॅडवर बॉल आदळून एकतर एलबीडब्ल्यू आउट करायचा किंवा बोल्ड करायचा. या 
चक्रीवादळातून कोणी बॅट्समन वाचलाच तर मग त्याला भुलवणारा गोंडस गुगली त्याची विकेट उडवायचा.
शेन वॉर्न त्याच्या पहिल्या मालिकेत तो प्रभावी कामगिरी करु  शकला नाही. त्यानंतरच्या सिरीजमध्ये तो संघातून बादही झाला. 1993च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये वॉर्न पुन्हा संघात आला. ओल्ड ट्राफोर्डवर सामना सुरू होता. माईक गेटिंग स्ट्राइकवर होता. वेगवान बॉलर्सचे स्पेल आटोपल्यावर अ‍ॅलन बॉर्डरने तरुण शेन वॉर्नला बॉल दिला. तेव्हा कोणालाही कल्पना नसेल की या बॉलरकडून टाकला जाणारा पहिलाच बॉल बॉल ऑफ द सेंच्युरी  म्हणून गौरविला जाणार आहे.
त्या तरु णाने तीन पावलांचा आपला बेबी स्टेपचा रनअप घेत बॉल टाकला. बॉलला ड्रीफ्ट मिळणं काय असतं, तसा डोळे सत्ताड उघडायला लावणारा ड्रीफ्ट त्या बॉलला मिळाला; पण पुढे जे होणार होतं ते बॅट्समनला, अम्पायरला, मैदानातील सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना व जगाला अचंबित करणारं होतं. लाजवाब ड्रीफ्ट मिळालेला लाल बॉल लेग स्टम्पच्या बाहेर पडून, जंगलात शिकार करत असलेल्या रानडुकराने अचानकपणे झपकन आपली दिशा बदलावी आणि ढुशी मारावी तशी आपली दिशा बदलली. माईक गेटिंगचा ऑफ स्टम्प उद्ध्वस्त झाला होता. स्वतर्‍ माईक गेटिंगला नक्की काय घडलंय याचा उलगडा झाला नाही. अम्पायर भरदुपारी भूत बघितल्यासारखा अवाक् झाला. 
त्या युवा लेग स्पिनरचा तो बॉल आजही बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखला जातो.
लेग स्पिनरचं सगळं करिअर हवा, उंची, लांबी, वेग या भौतिकशास्नतील गोष्टींशी पूर्णपणे  बांधिल असतं. शेन वॉर्नने जणू स्वतर्‍च्या मनगटाला, बोटांना या नियमांशी जुळवून घेतलं होतं. त्यामुळे  सृष्टीही जणू त्याला हवा तसा पाठिंबा बॉलला देत होती. महाभारतामध्ये शकुनीचे फासे जसे त्याच्या अखत्यारित असायचे, तो म्हणेल तसेच पडायचे तसा बॉल शेन वॉर्नची जणू गुलामी करायचा. प्रिकोडिंग केल्याप्रमाणे हवा तसा बॉल पडायचा, वळायचा, फिरायचा.
शेन वॉर्न ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझिलंड, वेस्ट इंडिज अशा देशात जिथे स्पिनर्सला मुळातच मदत नसते तिथे आपली बोटांची जादू हा लेग स्पिनर दाखवत राहिला. 
विश्व काबीज करणार्‍या  सिकंदरचाही घोडा शेवटी कुठेतरी अडलाच होता, तसा जगभर स्वतर्‍चं नाणं खणखणीत वाजवणार्‍या शेन वॉर्नचं नाणं भारतात मात्र वाजू शकलं नाही. 
1998 हे वर्ष सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष आहे. सचिन तेंडुलकर त्यावेळी पूर्ण भरात होता. वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येणार होती. सगळीकडे शेन वॉर्नची दहशत होती. सचिन आणि शेनची स्पर्धा रंगणार सगळीकडे चर्चा होती. त्यामुळे सचिन तेंडुलकरने साईराज बहुतुले सकट मुंबईतील अनेक लेग स्पिनर्सला नेट्समध्ये सरावासाठी बोलवले. भारत-ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला. सचिनच्या बॅटिंगपुढे शेन वॉर्न नामोहरम झाला. भारताने ती मालिका जिंकली. त्यानंतर प्रसिद्ध शारजा कप झाला. ज्यात सचिनने रुद्रावतार धारण करून ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सना अक्षरशर्‍ धुतले. भारताने शारजा कप जिंकला. तेव्हा शेन वॉर्नने मोठय़ा मनाने, मोकळेपणाने सांगितले की सचिन त्याच्या स्वप्नातदेखील त्याला सिक्स मारतो. शेन वॉर्नला काय माहीत होतं भारतीय लाउड मीडिया या एका सहज बोललेल्या वाक्याचा प्रचंड बाऊ करेल. शेन वॉर्न मात्र त्याच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाप्रमाणे जगत राहिला.

अर्थात, वॉर्नने चिक्कार गुण उधळले. डोपिंग टेस्टमध्येही तो दोषी आढळला. त्यातूनही त्यानं कमबॅक केलं. पुढे व्यक्तिगत आयुष्यातही त्याच्यावर बरेच आरोप झाले. मात्र त्यानं पुढे आयपीएलही गाजवली आणि कॉमेण्ट्री बॉक्सही. 
लेग स्पिन ही एक नाजूक कला आहे. दहा ऑफ स्पिनरनंतर एखादा लेग स्पिनर होतो. ऑफ स्पिनरकडे स्वतर्‍चं संरक्षण करण्याचा प्लॅन बी असतो. आयुष्यात कधी बॉलिंग न करणारेसुद्धा ऑफ स्पिन टाकू शकतात; पण लेग स्पिनर हे पार्ट टाइम नाही फुल टाइम, फुल फ्लेज्ड काम आहे. 
क्रिकेटमधील लेग स्पिन कलेला वॉर्नने खर्‍या अर्थाने ग्लॅमर दिलं.

( अभिजित ब्लॉगर आहे.)
 

Web Title: IPL in Sharjah-Dubai, & Shane Warne.. a great leg spinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.