How Does Consuming Porn Impact Your Health | सावधान! Porn पाहण्याची चटक जगणं पोखरू शकते, कारण... 
सावधान! Porn पाहण्याची चटक जगणं पोखरू शकते, कारण... 

ठळक मुद्देहातात मोबाइल आहे. इंटरनेट वेगवान झालंय. त्यामुळे पोर्नही अगदी सहजासहजी, थेट हातात मिळू लागलं आहे. पोर्नमुळे काहींच्या मनात सेक्सबद्दल भीती निर्माण झालेली असते. पोर्नोग्राफी म्हणजे सेक्स नाही तर सेक्सचा व्यापार आहे.

>> अमोल काळे

१८ ते २२ वयोगटातील तरुण-तरुणी पोर्न पाहतात. त्यांच्या हातातल्या मोबाइलने लैंगिक विषयांची माहिती त्यांना सगळ्यात आधी करून दिली आहे. मात्र त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड गैरसमज आणि प्रश्न आहेत.. ज्यांची उत्तरं कुणीही देत नाही.. 
..............

'पोर्न पाहणं हे व्यसन आहे का? याचा परिणाम बुद्धीवर होतो का? काय होतो?'

'माझं वय २० आहे. मी साधारण १३-१४ व्या वर्षापासून पॉर्न पाहतो. आठवड्यातून किमान दोनवेळा तरी पॉर्न पाहतो. मला ते पाहताना आनंद वाटतो; पण नंतर अस्वस्थ वाटतं, निराशा येते. यावर उपाय सुचवा.'

असे अनेक आणि याहून अधिक मोकळेढाकळे प्रश्न तरुण मुलं आम्हाला विचारतात. 'तथापि' हा आम्ही चालवत असलेला एक ट्रस्ट. त्याअंतर्गत लैंगिक शिक्षण, शास्त्रीय दृष्टिकोन आणि जागरुकता यासंदर्भात आम्ही काम करतो. त्यासाठी आमची एक वेबसाइटही आहे. तर या वेबसाइटवर तरुण मुलांचे प्रश्न येत असतात. धक्का बसेल मात्र विचारले जाणारे जास्तीत जास्त प्रश्न हे पोर्न पाहण्याच्या सवयीतून आलेले दिसतात. आम्ही पुण्यात काम करतो तर पोर्न पाहणाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. अर्थात, इंटरनेट साक्षरता आणि उपलब्धता पुण्यात अधिक आहे, त्यांचाही इथे जवळचा संबंध आहे. परंतु तरुणांशी थोडा अधिक आपुलकीने संवाद साधला तर पोर्न आणि लैंगिक जाणिवा, समज-गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न यांचा जवळचा संबंध दिसतो.

आमचा एक सहकारी निहार याने गेल्या दोन वर्षांत एका प्रकल्पासाठी पुणे आणि आसपासच्या महाविद्यालयांतल्या १८ ते २२ वयोगटामधल्या अनेक मुला-मुलींशी 'लैंगिकता' या विषयासंबंधी संवाद साधला. त्यांचे विचार आणि प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्या लक्षात आलं की, आजकाल जवळपास सर्व मुला-मुलींना सेक्स किंवा लैंगिकता या विषयातली पहिली माहिती ही पोर्नोग्राफी किंवा तत्सम डिजिटल माध्यमातून मिळते. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या हातात मोबाइल आहे. इंटरनेट वेगवान झालंय. त्यामुळे पोर्नही अगदी सहजासहजी, थेट हातात मिळू लागलं आहे. सॉफ्ट पोर्नच्या रूपातही अनेक गोष्टी उपलब्ध असतात. ते पाहून बऱ्याच जणांना स्वत:बद्दल आणि एकूणच लैंगिक गोष्टींबद्दल प्रश्न पडू लागतात. काहींच्या मनात (खासकरून मुलींच्या) सेक्सबद्दल भीती निर्माण झालेली असते. तरुण मुलांचे काही गैरसमज होतात. त्यातून त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरं न मिळाल्याने डोक्यातला संभ्रम वाढतो आणि चुकीच्या गोष्टी मनात घर करून बसतात. आणि यासंदर्भात कुणाशीच बोलता येत नसल्याने अनेकजण कोंडमारा तरी सहन करतात किंवा अजून माहिती मिळवण्याच्या नादात इंटरनेटवर चुकीची माहितीच मिळवत राहतात.

पोर्नोग्राफीची काळी बाजू

गेल डाइन्स. ही पोर्नोग्राफीला विरोध करणारी एक स्त्रीवादी कार्यकर्ती आहे. 'पोर्नलॅण्डः हाउ पोर्न हॅज हायजॅक्ड अवर सेक्शुअ‍ॅलिटी' या तिच्या पुस्तकामध्ये तिने पोर्न संस्कृतीमुळे स्त्री-पुरुषांची आयुष्यं, नाती आणि लैंगिकतेच्या कल्पना कशा बदलत चालल्या आहेत याचा मागोवा घेतला आहे. तिच्या म्हणण्यानुसार आजघडीला दरवर्षी साधारणपणे ९७ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असणारा हा व्यवसाय आहे. इंटरनेटमुळे पोर्नोग्राफी सगळ्यांच्या आवाक्यात आली, स्वस्त झाली आणि पडद्याआड झाली. या तीन गोष्टी मागणी वाढण्यासाठी जबाबदार ठरल्या आहेत. तरुण मुलांचे नातेसंबंध, स्वत:बद्दलच्या प्रतिमा काही प्रमाणात बदलायला सुरु वात झाली आहे. आणि त्याला पूर्ण नाही तरी काही प्रमाणात पोर्न इंडस्ट्री जबाबदार आहे. एक लक्षात ठेवा, पोर्नोग्राफी म्हणजे सेक्स नाही तर सेक्सचा व्यापार आहे.

पोर्न उद्योगानं लैंगिकतेचं वस्तुकरण केलं आणि ते आपल्यालाच विकायला सुरुवात केली. यात फक्त पोर्न इंडस्ट्री नाही तर फॅशन, प्रसारमाध्यमं आणि म्युझिक इंडस्ट्री हातात हात घालून काम करतात. या सगळ्यांनी स्त्री, पुरुष, मर्दानगी आणि लैंगिकतेच्या काही साचेबद्ध प्रतिमा आपल्या माथी मारल्या आहेत. आणि अनेकजण तेच सारं खरं मानून चालले आहेत. तेच अधिक धोकादायक आहे.

पोर्नचं व्यसन असतं का?

पोर्न हे व्यसन आहे का नाही या बाबतीत सांगायचं झालं तर शास्त्रज्ञांचे दोन तट पडलेले दिसतात. काहीजण पोर्न मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे असं म्हणतात; तर काही, त्यानं काही बिघडत नाही असं ठासून सांगतात.

पोर्न पाहिल्यामुळे मेंदूत डोपामाइन नावाचं द्रव्य मोठ्या प्रमाणावर स्रवतं. यामुळे माणसाला एक सुखकर संवेदना होते. खरं म्हणजे कुठलीही आवडणारी गोष्ट केली की मेंदूत हे द्रव्य स्रवतं. आपल्याला ती गोष्ट पुन: पुन्हा करायची प्रेरणा त्यातून मिळते. पोर्न पाहून डोपामाइन स्रवलं की आणखी पोर्न पाहायची इच्छा निर्माण होते. पण त्यातून होतं असं, की तुम्ही जितकं जास्त पोर्न पाहाल तितकी या द्रव्याला प्रतिसाद द्यायची तुमच्या मेंदूची क्षमता कमी होते. साहजिकच सुखाची तीच पातळी अनुभवायला जास्त डोपामाइनची गरज पडते. म्हणजे तेवढंच सुख मिळवायला जास्त पोर्न पाहणं आलं. असा तिढा आहे. हे एक दुष्टचक्रच आहे.

एखाद्या गोष्टीची चटक लागते तशी पोर्नचीही लागते. पण त्याला पोर्नचं व्यसन लागतं म्हणता येईल का? व्यसनाच्या बाबत एक विशेष म्हणजे ज्याचं व्यसन लागलं आहे ते मिळालं नाही तर त्याची परिणती प्रचंड मानसिक दुरवस्थेत होते. या दृष्टीनं पाहता पोर्नची चटक ही सवय आणि व्यसन याच्या दरम्यान कुठंतरी येते.

पुढे काय?

>> या विषयावर आणखी बरंच संशोधन होण्याची गरज आहे.

>> पोर्नमुळे मानसिक आरोग्याला धोका पोहोचतो असं छातीठोकपणे जरी म्हणता येत नसलं तरी त्याची दाट शक्यता आहे.

>> कधीमधी पोर्न पाहिलं तर विशेष काही बिघडत नाही; पण ते पाहायची चटक लागली तर कौटुंबिक, सामाजिक आणि वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

>> तेरा ते वीस वर्षांची मुलं-मुली पोर्न पाहतात, त्यांच्याशी बोलून त्यातले धोके त्यांना समजावून सांगायला हवेत.

* भारतीय कायदा काय म्हणतो?

>> अश्लील वाङ्मय तयार करणं, विकणं भा.दं.सं. २९२ कलमानुसार गुन्हा आहे.

>> २० वर्षांखालील मुला/मुलींना अश्लील वाङ्मय विकणं भा.दं.सं.२९३ नुसार गुन्हा आहे.

>> एखाद्या व्यक्तीने अश्लील वाङ्मय खासगीत बघणं, बाळगणं गुन्हा नाही; पण ते दुसऱ्यांना दाखवणं, देणं, विकणं, पाठवणं म्हणजे फॉरवर्ड करणं गुन्हा आहे.

www.tathapi.org/letstalksexuality.com


Web Title: How Does Consuming Porn Impact Your Health
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.