coronavirus : काळाच्या दुसऱ्या तुकडय़ात गावाकडची पोरं कशी जगतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:55 AM2020-04-16T06:55:05+5:302020-04-16T07:00:10+5:30

गावात हिंडता फिरता येत नसल्यामुळे पोरांनी रानाची वाट धरली. चार-सहा पोरे मोबाइलवरून एकत्न येतात, जमेल तितकं सोशल डिस्टन्सिंग पाळत एखाद्याच्या गोठय़ावर जाऊन एखादा कोंबडा खसकावतात. गावगप्पा-गजाली मारत जेवणं करतात. परक्या शहरातली ससेहोलपट टळून आपण आपल्या माणसांत आलो आहोत याचं सुख वाटून घेतात.

coronavirus: students, young men back to thier villeges in maharashtra, what are they upto in this corona crisis? | coronavirus : काळाच्या दुसऱ्या तुकडय़ात गावाकडची पोरं कशी जगतात?

coronavirus : काळाच्या दुसऱ्या तुकडय़ात गावाकडची पोरं कशी जगतात?

Next
ठळक मुद्देआपण परत आपापल्या कामधंद्याला लागू अशी त्यांना आशा वाटत राहते.

- बालाजी सुतार

गावाच्या दोन दिशांनी येणारे दोन रस्ते एकमेकांना दोन जागांवर छेदतात, तिथे आपसूक तयार झालेले दोन बारीकसे चौक आहेत.
दोन-पाच बारकी बारकी हॉटेले, काही विडी-सिगरेट-पुडय़ांच्या टप:या, टप:यांइतक्याच आकाराची काही बारकी बारकी दुकानं, त्यासमोरची बाकडी किंवा प्लॅस्टिकच्या तकलादू खुच्र्या. 
गावातली बहुतेक तरणी पोरे सकाळी आंघोळी झाल्या की इथे येऊन रेंगाळतात. भूक लागल्यावर घरी जातात. जेवून-खाऊन झाल्यावर परत इथेच येतात. टिवल्याबावल्या करून सांजेर्पयत वेळ घालवायचा असेल तर या चौकांमध्ये येऊन बसायचं. इथेच दोस्तदार भेटतात. 
इथूनच जाणा:या-येणा:या येष्टय़ांच्या खिडक्यांमधून अधूनमधून रम्य चेहरे दिसतात. बरं वाटत राहतं.
गावाहून जवळच्या शहरात कॉलेजात जाऊन येऊन असलेली पोरे जाण्यासाठी आणि परतल्यावर बसेसची वाट पाहत इथेच उभी असतात. एकमेकांना चहापाणी-पुडी खाऊ घालतात. पोलीस भरती, तलाठी-ग्रामसेवकाच्या जागा कुठे निघाल्यात याची एकमेकांकडे चौकशी करतात. माहिती पुरवतात. पुण्यात राहून वर्षानुवर्षे एमपीएससी करणारे काही वीर गावाकडे येतात तेव्हा सुरुवातीच्या काळात घराची मंडळी, भावकी आणि उरलेलीही गावातली मंडळी यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. जणू हे आताच डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी किंवा गेला बाजार पीएसआय झालेले आहेत, अशी सुरुवातीला यांच्याशी जनतेची वागणूक असते. 
हळूहळू दिवस-महिने-वर्षे जात राहतात आणि ही भावी साहेबमंडळी एखाद-दुसरा अपवादवगळला तर कायम ‘भावी’च उरलेली आहेत, लक्षात यायला लागतं तसंतसं घरच्या-दारच्या लोकांची यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लागते. हळूहळू पोरे गावाकडे यायचं टाळत राहून पुण्यातच पोहे वगैरे खात दिवस कंठायला लागतात. पण हे बरंच पुढचं चित्न असतं. घरच्यांचा आणि स्वत:चाही हिरमोड होण्याआधी ही उत्साही मुलं गावाकडे येतात तेव्हा समवयीन मुलांसोबत छानदारपणो चौकातून बसलेली असतात. ‘अधिकारी’ असण्याच्या आणि अर्थातच पुण्यातल्या पेठेतल्या आपल्या रहिवासाच्या सुरस कथा ऐकवत असतात. गावातली, तालुक्याच्या गावात कॉलेजात जाणारी पोरं हलवायाच्या दुकानातल्या मिठाईकडे पाहणा:या बिट्टय़ा पोराच्या डोळ्यांनी या आगामी साहेब लोकांच्या गप्पा ऐकतात. त्यांचं मनापासून स्वागत करतात.
या सगळ्यातून पार झालेली काही तरुण मुले असतात. त्यांनी एमपीएससीची एखादी पोस्ट काढलेली असते, किंवा कुठल्यातरी शाळा-कॉलेजात पर्मनंट मास्तरकी किंवा प्राध्यापकी पटकावलेली असते किंवा औरंगाबाद, पुणो, मुंबई, हैदराबादेत कंपन्यांतून बस्तान बसवलेलं असतं. नाइलाज म्हणून शहरात राहिलेली; पण कायम गाव खुणावत असलेली ही मुले असतात. यांना गावाकडे येताना मनापासून आनंद झालेला असतो आणि यांचं स्वागत करताना गावालाही आनंद वाटत असतो.
एरवीचं चित्र हे असं रमणीय असतं. 
एरवीचं. 
आज परिस्थिती बदललेली आहे.


गावातले ‘मोस्ट हॅपनिंग’ स्थळ असलेले हे चौक स्वत:च्या अवकाशात आता सुन्न शांततेची चादर लपेटून गोठल्या चित्नासारखे बधिर झालेले आहेत. दुकानं, हॉटेले, टप:या बंद आहेत. एखादं किराणाचं किंवा औषधाचं दुकान उघडं असतं; पण त्यात धंद्यापेक्षाही कर्तव्यबुद्धीची जाणीव अधिक आहे.
24 मार्चला सगळा देश लॉकडाउन अवस्थेत गेला आणि रस्त्यावर येता येणं अवघड झालं, शाळा-कॉलेजेस, क्लासेस बंद झाले, जिथे खायचं त्या मेस आटोपल्या. वातावरणात भयाचं सावट पसरलं आणि ज्यांना शक्य होतं, त्या पोरांनी शहराकडून गावाची वाट धरायचा प्रयत्न केला. अर्थात हे सोपं नव्हतं. रस्त्यांवरून वाहने नव्हती. त्याऐवजी पोलीस होते जागोजागी. दोनशे किंवा चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाकडे पायी चालत जाणं हा एक मार्ग होता. तो अनेकांनी वापरलाही. मजूरवर्गातली अक्षरश: लाखो माणसं अशी चालत खुरडत गावाकडे निघाली होती. त्यात ही दूर शहरात राहून काहीबाही शिकणारी, नुकतीच एखाद्या कामचलाऊ नोकरीला लागलेली पोरंही होती. काही सुदैवी पोरांना एखादा दुधाचा टँकर, एखादं मालवाहू बंदिस्त कंटेनर चोरून लपून सापडलं, त्यात जीव गुदमरवून स्वत:ला कोंडून घेत त्यांनी गावाची दिशा धरली आणि ही सगळीच मंडळी गावात पोहोचण्याच्या आधीच इथे-तिथे पोलिसांनी उतरवून घेतली. धड गावात नाही, धड शहरात नाही अशी अधेमधेच कुठेतरी ही मुलं निर्वासित झाली. 
यातून निसटली आणि गावात पोहोचली, त्यांच्या मनात असेल की नेहमीसारख्याच प्रेमाने हात फैलावून गाव आपल्याला कुशीत घेईल. आफ्टरऑल, गाव पोरांचं होतं, आणि पोरं गावाची.
पण परागंदा पोरं गावाजवळ आली आणि चपापली. उरात धसकली.
चौकातून गावात जायच्या रस्त्यावर दगडधोंडे, काटेकुटे, लाकूडफाटा टाकून रस्ता बंद केलेला होता आणि पोरांचेच यारदोस्त, भाऊबंद तिथं पहारा देत बसलेले. पोरं आणि त्यांच्या यारदोस्तांमध्ये गावाच्या वेशीतच हमरीतुमरी झाली, ही पोरांसोबत गावाच्याही आतडय़ालाही पीळ पाडणारी गोष्ट होती.
कायद्याने कुणाला गावाबाहेर ठेवता येत नाही, पोरं गावात-घरात पोहचली खरी; पण त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जाणं साहजिक होतं. गावातल्या ग्रामपंचायतीने, आरोग्य-व्यवस्थेने पोरांना ‘रडार’वर घेतलं. हे अर्थात आवश्यकच होतं; पण कोरोनाच्या एका निर्जीव व्हायरसने वातावरणातली सगळी ओल, ऊब आणि जिव्हाळा शोषून घेतल्याचंही हे निदर्शक होतं.
एकमेकांतल्या जिव्हाळ्याची देवघेव करायला निदान चौक मोकळे असायला हवे होते, असं वाटणं या साथरोगाच्या संदर्भाने धोकादायक असलं, तरी भावनेच्या अंगाने गैरवाजवी नव्हतंच. 
चार-सहा दिवसांत गावाला पोरांबद्दल ‘हा सायलेंट कॅरिअर नसल्याबाबत’ विश्वास वाटायला लागला आणि मग गावांनी पोरांना आपलेपणा द्यायला सुरुवात केली. तरीही, गावात हिंडता फिरता येत नसल्यामुळे पोरांनी मग रानाची वाट धरली. चार-सहा पोरे मोबाइलवरून एकत्न येतात, आपापल्या गल्लीबोळातून वाट काढत शिवारात जातात, जमेल तितकं सोशल डिस्टन्सिंग पाळत कुणाच्या एखाद्याच्या गोठय़ावर जाऊन एखादा कोंबडा खसकावतात. गावगप्पा-गजाली मारत जेवणं करतात. परक्या शहरातून झाली असती ती ससेहोलपट टळून आपण आपल्या माणसांत आलो आहोत याचं सुख वाटून घेतात. स्वत:च्याही घरच्या रानात जातात, रबीची कामे चालू आहेत, त्यात लक्ष घालतात.
कोरोनाच्या या राक्षसी सावटाखालून लवकरच मुक्त होऊ आणि परत आपापल्या कामधंद्याला लागू अशी त्यांना आशा वाटत राहते.
दरम्यान, क्वचित कुणाला रामेश्वर सीताराम पवारची बातमी वाचायला मिळते. 
रामेश्वर पवार हा दिव्यांग तरुण. पुण्यात रंगकाम करणारा. साथ चालू झाली तेव्हा बायकोमुलांना त्याने गावाकडे पाठवलं आणि स्वत: कामाचे पैसे मिळवून मागून यायचं ठरवलं. 
दरम्यान, एकाएकी लॉकडाउन जाहीर झालं. घरं, दुकानं, मोटारी बंद झाल्या. आणि ‘पॅनिक’ झालेला रामेश्वर बीड जिल्ह्यातल्या आपल्या काळेगाव तांडा या गावी जाण्यासाठी पायी निघाला. 
आधीच दिव्यांग आणि त्यातून धैर्य खचू पाहत असलेल्या अवस्थेतला हा पायी प्रवास.
शिरूरजवळ आल्यावर त्याने घरी फोन केला, त्यात त्यानं कळवळून सांगितलं की, ‘‘मी खूप दमलो आहे. मला भूक लागलीये, तहान लागलीये आणि कुठंच काही मिळत नाहीय. काहीतरी करून मला घ्यायला या.’’
घरचे लोक त्या तजविजीला लागले असतील आणि काही वेळाने रामेश्वरचा फोन नॉट रिचेबल झाला. 
आता त्याला घ्यायला कुठे जायचं? घर वाट पाहत राहिलं आणि दिवस-दोन दिवसांनी पोलिसांनी कळवलं, की रस्त्यातल्या कुठल्याशा विहिरीत त्याचा मृतदेह सापडला आहे. तहान असह्य होऊन दिव्यांग रामेश्वरने पाण्यासाठी विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला आणि तिथं बुडून त्यानं हा ग्रह सोडला.
प्रशासनाने मृतदेह परत पुण्याला नेला आणि तिकडंच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. 
रामेश्वरला पुन्हा गाव दिसलं नाही.
बातमी वाचताना काळाच्या दुस:या तुकडय़ात सुखरूप पोहोचलेली पोरं देहभर शहारून येतात. 
अंगावर सरसरून काटा उठतो पोरांच्या.


( लेखक- नाटककार आहेत.)
 

Web Title: coronavirus: students, young men back to thier villeges in maharashtra, what are they upto in this corona crisis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.