coronavirus : कल्पना करा, लॉकडाउन आहे आणि अचानक तुमचा स्मार्टफोन बिघडला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 06:55 AM2020-04-23T06:55:05+5:302020-04-23T07:00:12+5:30

मोबाइलवर पूर्णपणो अवलंबून राहून आपलं भावनिक, मानसिक स्वातंत्र्य त्यालाच बहाल करणं आणि यंत्रचं गुलाम होणं हे किती योग्य? या लॉकडाउनमध्ये विचारा स्वत:ला.

coronavirus: mobile-smartphone dependancy in corona lockdown is killing your strenth. | coronavirus : कल्पना करा, लॉकडाउन आहे आणि अचानक तुमचा स्मार्टफोन बिघडला तर?

coronavirus : कल्पना करा, लॉकडाउन आहे आणि अचानक तुमचा स्मार्टफोन बिघडला तर?

Next
ठळक मुद्देमोबाइलवर कोण किती डिपेण्ड

- प्राची पाठक

आपल्या हातात मोबाइल नसताच या कोरोनाकोंडीत तर कसा वेळ घालवला असता आपण?
 कल्पना करा, आपण घरात कोंडले गेलेलो आहे, त्यात मोबाइल नाही. नेट पॅक नाही. सोशल मीडिया तर नाहीच नाही.
तर काय केलं असतं?
मान्य आहे की, अजूनही काही कॉलेजमध्ये काही विद्याथ्र्याकडे आजही स्मार्टफोन नसतो किंवा वापराला बंदी असते.
परंतु तरीही प्रत्येकाच्या मनात असतं की, पहिली कमाई झाली की पहिले भारीतला स्मार्टफोन घेऊ.
पण असे काहीजण अपवाद.
बाकी सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेच. तो आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्यासारखे त्याला जपतात.
तोच जीव की प्राण. त्याला जरासुद्धा हातावेगळं करत नाही.
आता लॉकडाउनच्या काळातपण पाहा, दिवसभरातला आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाइल अपडेट बघण्यात, त्यावर वेगवेगळे व्हिडीओ बघण्यात जात असतो. मित्न-मैत्रिणींनी काय स्टेटस टाकलं आहे, ते जर आपण रोजच्या रोज बघितलं नाही तर आपल्या आयुष्यातून खूप काही मिसआउट होऊन जाणार आहे, अशी खात्नी असल्यासारखं मुलं-मुली एकमेकांचे स्टेटस अपडेट्स बघत असतात. त्यातून तुलना सुरू होते ती वेगळीच. त्याचं स्टेटस अपडेट इतकं भारी, माझं कमी भारी, ही सगळी गणितं डोक्यात सुरू असतात. सध्या तर कोरोनाच्या लेटेस्ट बातम्या कोण आधी सांगतो, अशी स्पर्धा सुरू असल्यासारखं अपडेट्स घेणं सुरू असतं. टिक-टॉक व्हिडीओ, तासन्तास फोनवर बोलणं, सोशल मीडियात गप्पा, जी कुठली लिंक फॉरवर्ड होत येईल, ती बघत वेळ काढणं, हे सर्व दिवस-दिवस असतं. अगदीच घरात कोणी आरडाओरडा केला, तर स्वत:चं आवरणं, अंघोळ करणं, जेवणखाण अशी दैनंदिन कामं करायला आपण नाइलाजाने उठतो. तोवर हातात फोन असतोच. अगदी कमोडवर बसल्या बसल्यादेखील फोन हातात असतो अनेकांच्या. जेवताना फोनमध्ये लक्ष, झोप येत नाही, म्हणून फोन बघायचा आणि फोनमध्ये लक्ष म्हणून झोप न येणं, असं सगळं दररोज सुरू असतं. 

हा फोन इतका आवश्यक आहे का? 
गरजेला महत्त्वाचा निरोप देता येणं, हे त्याचं खरं काम. 
त्यात जास्तीच्या सोयी मिळाल्याने एक ना अनेक कारणांनी आपण त्यात गुंतून पडतो.
नेमकं कशासाठी आपण फोन वापरतो आणि वापरायला हवा, याचा आपण विचार करून पाहू.
या लॉकडाउनच्या काळात आपल्याला वेळ आहे
तर आपण नक्की कुणावर आणि किती अवलंबून आहे?
- हे शोधू आणि विचारू स्वत:ला, की आपण आपल्या मोबाइलवर इतके अवलंबून आहोत, एक दिवस तोच नसेल तर?
1. त्यापेक्षा  मोबाइलवर आपण करत असलेल्या महत्त्वाच्या कामांची यादी करू.
 एखादं बुकिंग करायचं असेल, काही फोटो काढून ठेवायचे असतील, कसला रिचार्ज असेल, काही निरोप द्यायचे-घ्यायचे असतील, एखादी माहिती सर्फकरायची असेल, कुठे अर्ज पाठवायचा असेल, वगैरे. 
यातलं काय आपल्याला अगदी रोजच्या रोज करायचं असतं? काही कामं ही महिन्याने करायची असतात. काही रिचार्ज तीन महिन्यांनी. म्हणजे रोजच्या यादीतून ते वगळता येतील. मग रोज करण्यासारख्या अत्यावश्यक गोष्टी तपासायच्या. 
आपल्या लक्षात येईल की रोज तासन्तास फोनवर बोलण्यासारखं आपल्याकडे विशेष काहीच नसतं. अशी कोणतीही अतिमहत्त्वाची माहिती आपल्याला पास ऑन करायची नसते. वेळ घालवण्यासाठी हाताशी बरं काही नाही, हातात मोबाइल आहे आणि त्यात सहज उपलब्ध असलेला डेटा पॅक आहे, म्हणून आपण आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस अनावश्यक गोष्टींवर वाया घालवत असतो. इतकी सगळी माहितीची देवाण-घेवाण करून आपण कोणत्या स्पर्धा परीक्षेत अव्वल येणार नसतो. कारण, ती माहिती किती खरी, किती खोटी, याचा थांग काढत बसावं लागेल. 
2. दुसरं म्हणजे, इतका वेळ घालवून आपण आपला मनाची डस्टबिन बनवून ठेवतो. त्यात नकळत थकवा तर येतोच; पण इतका वेळ देऊनही आपण आणखीन काही माहीत करून घ्यायचं राहिलंच आहे, अशी भावनाच मनात जास्त असते. 

3. पुढचा मुद्दा व्हिज्युअल स्टिम्युलेशन. आपल्या डोळ्यांना सतत विशिष्ट ब्राइटनेस असलेली गोष्ट दिवसरात्न जवळून बघायला लावणं. रात्नी झोपताना तर हे स्टिम्युलेशन आपल्या झोपेचं खोबरं करू शकतं. कानांना सतत काहीतरी त्या मोबाइलच्या डब्यातून ऐकत बसायची सक्ती करणं. हाताच्या आणि मानेच्या स्नायूंना दिवस दिवस एक प्रकारचा ताण देणं. आपण फोन कोणत्या पद्धतीने हातात घेऊन बसलेलो असतो, त्यानेही आपल्या शरीराच्या ठेवणीवर परिणाम होतो. उगाचच ओढवून घेतलेली ही पाठीची, मानेची, हाताच्या स्नायूंची दुखणी असतात. 

4. इतकं सगळं आपण का करतो? कारण मोबाइलचा दिवसभरात नेमका किती वापर करावा, याची जाणीव आपण ठेवत नाही. त्याचा काही प्लॅन आपल्याकडे नसतो. हातात असलेला सगळा वेळ निर्थक गोष्टींवर घालवून आपण बसल्या बसल्या थकून जातो. इतकी माणसं त्या फोनमध्ये उपलब्ध असून, आपण एकटेच असतो. इतकी माहिती सतत अंगावर ओतून घेऊनदेखील आपल्या करिअरसाठी त्यातलं काहीच विशेष कामास येत नसतं. म्हणूनच, मोबाइलवर आपण घालवत असलेला वेळ प्लॅन करणं, त्याचा स्मार्ट वापर करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी आपल्या सोयीसाठी हवी. आपण तिच्यात गुरफटून पडून आपल्या शरीर, मनाची आणि पर्यायाने आपल्या करिअरची वाट लावायची गरज नाही. 

 


मोबाइल वापरायचा नाही,  तर करायचं काय?

1. दिवसातला काही वेळ व्यायामासाठी राखून ठेवता येईल का, ते बघू. म्हणजे व्यायामाची हुक्की अधून-मधून येत असतेच. तिला जरा नियमित करू. रोज व्यायाम करू.

2. घरात दोन-चार कुंडय़ा असतील किंवा घराला थोडं अंगण असेल, थोडी जागा असेल तर आपल्या आवाक्यातली जराशी शेती करून बघू. मातीत हात घालून बघू. फुलझाडं, भाजीपाला लावून बघू. 

3. घरातली काही कामं आपण वाटून घेऊ. स्वयंपाकाची तयारी, एखादी डिश बनवायला शिकणं, साफसफाई, अनावश्यक वस्तू काढून टाकणं, असं सगळं करायला आपल्याला वेळ मिळेल. त्यातून आपण फ्रेश तर होऊच; पण एकात एक कामं सुचतील. नवीन गोष्टींची यादी तयार होईल.

4. आपल्या गरजेपुरतं शिवणकाम आपल्याला येतं का? ते करून बघू. अगदी साधा सुई-दोरा घेऊन सुरु वात करू. 

5. घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्वच्छता, त्यांची दुरु स्ती, देखभाल करायला लागू. त्यांचे मॅन्युअल वाचून काढू. काही सेटिंग्ज चक्क फोनमध्ये शोधून शिकू. 

6. घरात धूळ खात पडलेली वाद्ये बाहेर काढू. त्यांची आणखी माहिती करून घेऊ. त्यांचा सराव करायला लागू. काही गोष्टी तर ऑनलाइन मोफत शिकवण्या लावूनही शिकता येतात. 
7. अशी एक ना अनेक कामं घरातच आपल्याला शोधता येतील. फोनचा वापर त्यामुळे मर्यादित होईलच; पण त्याच फोनच्या मदतीने आपण या ही विषयांची आणखीन माहिती नेमकी अशी शोधून काढू शकतो. 
करून तर पाहा..



( प्राची मानसरोगतज्ज्ञ आणि पर्यावरणासह सूक्ष्म जीवशास्त्रची अभ्यासक आहे.)
 

Web Title: coronavirus: mobile-smartphone dependancy in corona lockdown is killing your strenth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.