विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांच्या आवारात जंक फूड विक्रीला बंदी? -अशी धमकी देऊन काय होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:54 PM2018-08-30T14:54:30+5:302018-08-30T14:55:21+5:30

विद्यापीठाच्या मेसमध्ये एकूण आनंदच! खासगी मेसच्या आणि टिफिन डब्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या वेळेत सर्व झालं तर ठीक; नाहीतर उपासमार ठरलेली. मग रात्री उशिरा रस्त्यावरच्या गाडय़ांवर जे मिळेल ते पोटात ढकलायचं. तेही रोज कुठलं परवडायला? अनेक मुलांची रात्र फक्त चहा-बिस्किटांवरच जाते!

Ban on junk food in the premises of university and higher educational institutions? What will happen next.. | विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांच्या आवारात जंक फूड विक्रीला बंदी? -अशी धमकी देऊन काय होईल?

विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांच्या आवारात जंक फूड विक्रीला बंदी? -अशी धमकी देऊन काय होईल?

Next
ठळक मुद्देआडवेळेला, आडवाटेला जे मिळतं आणि परवडतं, ते पोटात ढकलण्याची मजबुरी कोणाला कळणार?

- कलिम अझिम

यूजीसीनं विद्यापीठ व कॉलेज कॅम्पसमध्ये जंक फूड बंदीच्या सूचना केल्या आहेत. निर्णय उत्तम खराच; पण मुळात कॉलेजात जाणारे तरुण-तरुणी या जंक फूडच्या विळख्यात सापडतातच का, याचा विचार ना आपल्याकडे कुणी गांभीर्याने करत, ना त्यावर काही उपाय शोधत!
तरुण मुलं फक्त चूस म्हणून, चटपटीत खाण्याची हौस म्हणून, स्टाइल म्हणून, इतर खातात म्हणून जंक फूड खातात हा समज तसा वरवरचा आणि सोयीस्कर! अर्थात वर उल्लेख केलेली कारणं तर आहेतच आहेत; पण ती फक्त तेवढीच नाहीत, हेही महत्त्वाचं! विद्यार्थीदशेत खाण्याचा विचार तसा सरळसोट असतो. गरजेनुसार आणि खिशाच्या ऐपतीनुसार असतो. आणखीही एक महत्त्वाचा निकष आहे र्‍ वेळ. भुकेची वेळ आणि बाकीच्या उद्योगातून पोटात काहीतरी ढकलायला उपलब्ध होणारा वेळ!
शिक्षणासाठी घराबाहेर राहणारी मुलं उपलब्ध वेळ आणि आर्थिक कुवतीनुसार मेस निवडतात. अनेकवेळा प्रोजेक्ट, प्रात्यक्षिके, असाइन्मेण्टमध्ये विद्याथ्र्याचा बराचसा वेळ खर्ची जातो, अभ्यासाच्या बैठकीत जेवायची वेळही अनेकदा टळून जाते. अशावेळी काहीतरी पोटात ढकलून पुन्हा अभ्यासाला लागणे हा मार्ग विद्यार्थी निवडतात. या सर्वात साहजिकच भुकेची आबाळ होते.
मी राहतो, त्या पुण्याचंच उदाहरण घ्या.
हे तरुणांचं शहर. आणि त्यातही शिकण्यासाठी या शहरात येऊन राहिलेल्या तरुण-तरुणींची संख्या या शहरात सर्वाधिक. अशा या पुण्यात मेसच्या आणि टिफिन डब्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या वेळेत सर्व झालं तर ठीक; नाहीतर उपासमार ठरलेली. ती टाळण्यासाठी रात्नी उशिरार्पयत चालणार्‍या स्ट्रीट फूड सेंटरचा आधार घेतला जातो. इथं इच्छा नसतानाही कमी वेळात तयार होणार्‍या  इन्स्टण्ट फूडमधून भूक भागवली जाते.
पुण्यातील कुठल्याही रस्त्यावर असे स्टॉल रात्नी उशिरार्पयत सुरू असतात. पण पुणे विद्यापीठ आवारात जेवणासाठी हॉस्टेल-मेस व रिफेक्टरीशिवाय पर्याय नाही. काही कॅण्टीनमध्ये सुमार दर्जाचा नास्ता व स्नॅक्स मिळतात.  पैसे देऊनही जेवण समाधानकारक मिळत नाही. ओपन कॅण्टीन बंद झाल्यानं जेवणाचे व नास्त्याचे हाल होत आहेत. हॉस्टेल-मेस व रिफेक्टरी आपल्या ठरलेल्या वेळेत चालू आणि बंद होतात. तिथं लवकर गेलं तर भल्या मोठय़ा रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं. उशिरा गेलं तर जेवण संपण्याची भीती. अशा प्रकारच्या दोन्ही अडचणींचा सामना करून अनेकजण आपली जेवणाची गरज भागवतात. जेवणाच्या गुणवत्तेबद्दल काय बोलायचं अशी परिस्थिती आहे.
 2013-2014 साली रिफेक्टरीच्या जेवणात निघालेल्या अळ्यांवर अनेकदा आंदोलनं झाली; पण दर्जा अजूनही सुधारलेला नाही. मुंबई विद्यापीठ, बामू विद्यापीठात अशीच काहीशी अवस्था आहे.
विद्याथ्र्याना पौष्टिक जेवण मिळावं असा आग्रह शासन दरबारी अनेकदा केला जातो. पण, त्यासंदर्भात प्रयत्न मात्र कुठलीच यंत्नणा करत नाही. आहारशास्त्नाचा आधार घेतला तर पुण्यात कुठलीच मेस त्या अटी पूर्ण करू शकत नाही. गोखले इन्स्टिटय़ूट, सीओयूपी, बीएमसीसी, सिम्बी यासारख्या हॉस्टेल-मेसमध्ये जेवणाची क्वालिटी उत्तम असते. तिथं गुणवत्तेत तडजोड केली जात नाही. विद्याथ्र्याकडून पैसा घेतला जातो, त्याचप्रमाणे जेवणही उपलब्ध करून दिलं जातं. पुणे विद्यापीठात असताना तर आमचे जेवणाचे रोजच प्रचंड हाल व्हायचे. परिसरात असलेल्या कॅण्टीनमध्ये जेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा, बाहेर येऊनही नुसते पैसे जायचे, समाधान मिळायचंच नाही. पर्याय म्हणून आम्ही अनेक वेगवेगळ्या मेस शोधल्या. आयएलएस, कृषी महाविद्यालय, एफटीआय, फग्यरुसन, एमएमसी अनेक ठिकाणी जेवलो, कुठंच जेवणाबाबत समाधानाची बाब आढळली नाही. 
टिफिन नसेल तर दुपारचं व्यवस्थित असं जेवण कधीच होत नाही. दुपारी तीन-साडेतीननंतर अनेक हॉटेलांत जेवण संपतं, मग स्ट्रीट फूड खाण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा वडापाव, पावभाजीसारख्या जंक फूडवर भागवावं लागतं. 
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी तर स्ट्रीट फूडवरच जगतात. तासा-दोन तासाला बाहेर येऊन चहा, क्रीमरोल, वडापाव असा ऐवज पोटात ढकलला जातो. त्यामुळे जेवणाची इच्छाही मरून जाते. 
अनेक मुलं रात्नी उशिरार्पयत रिडिंगमध्ये बसतात. बारा -एकला झेड ब्रीजखाली फ्राइड राइस, नूडल्स, पावभाजीसारखं जंक फूड, तर कधी सुमार दर्जाची राइस प्लेट, खिचडी, पुलाव गिळून गरज भागवावी लागते. दररोज हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकजण रात्नी फक्त चहा-बिस्किटांवर भागवतात. काहीजण एफसी रोडला पाश्चात्त्य फूड कन्झ्यूूम करतात. इथं अमाप पैसा जाऊनही शरीराला पोषक असं अन्नद्रव्य मिळत नाही.
आहारशास्त्नाचा विचार केला तर या शहरातल्या तरुण-तरुणींच्या नशिबी एकूण सगळी आबाळच असते. खरं तर या वयात उत्तम आणि पुरेशा आहाराची गरज असते.  योग्य आहार व झोप मिळाल्यास विद्याथ्र्याची स्मरणशक्ती वाढते; पण शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्याथ्र्याना पौष्टिक जेवणाच्या अभावामुळे सदृढ आरोग्य लाभत नाही. दैनंदिन जेवणाचा दर्जा चांगला असावा एवढय़ावरच भागत नाही, तर त्यातून मिळणार्‍या  कॅलरीजही महत्त्वाच्या असतात. आज रस्त्यावर मिळणार्‍या बर्‍याच खाद्यपदार्थातून प्रथिनं व शरीराला लागणारी अन्य पोषकतत्त्वं मिळतात असं नाही. ब्रेड व पावाला जोडून मिळणारे प्रत्येक पदार्थ शरीरासाठी घातक आहेत, हे अनेक संशोधनातून सिद्ध झालंय. तरीही असे पदार्थ सर्रास खाल्ले जातात. मुंबईनं तर वडापावला जणू नॅशनल फूड घोषित केलंय. मुंबई स्पीरिट मिरवणारे वडापावच्या कौतुकाचे गोडवे गातात. मुळात वडापाव हे भूक भागवणारं स्वस्तातलं एक साधन आहे, बिगारी मजूर, कामगारांचा उपाशी झोपण्यापासून बचाव व्हावा ही भूमिका त्यामागे आहे; पण अलीकडे मुंबईच्या 
तरुणाईत वडापावचं कल्चर फोफावलं आहे. गरज व भूक नसताना उगाच ते गिळलं जातं. असे खाद्यपदार्थ विद्याथ्र्याना शारीरिकदृष्टय़ा हानिकारक असल्याचं भारतीय खाद्य सुरक्षा व मानांकन संस्थेनं केलेल्या अनेक सर्वेक्षणातून समोर आलंय.
फॅशन म्हणून विद्यार्थी अनेकदा पिझ्झा, स्नॅक्स, बर्गर खातात. ट्रीटमुळे जिभेवर रुळू लागलेला हा प्रकार दैनंदिन आहाराचा भाग बनतो. काहीजण तर असे आहेत की असं जंक फूड खाल्ल्याशिवाय त्यांची भूकच भागत नाही. अलीकडे चायनिज फूड खाण्याची फॅशन तरु णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. असे पदार्थ सतत खाल्ल्यानं स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती कमी होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात, पण ते एकणार कोण? आणि ऐकलं समजा, तरी पर्याय कोणता शोधणार? कसा शोधणार?

विद्यार्थी जंक फूड गरज व पर्याय म्हणून स्वीकारतात. परिणामी शरीरात रासायनिक बदल होऊन कालांतराने उदासीनता व नैराश्याचं प्रमाण विद्याथ्र्यामध्ये वाढतं. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल होतो. शरीरात फॅटचं प्रमाण वाढून लठ्ठपणा वाढतो. जंक फूड खाण्याची इच्छा रोखता येत नाही, भूक नसतानाही वारंवार खात राहण्याची इच्छा बळावते. त्यामुळे जंक फूड खाण्याची सवय रोखता येऊ शकत नाही; पण त्याला पर्याय म्हणून पौष्टिक खाद्य स्टॉल उभे करता येऊ शकतात. अशा पद्धतीनं जंक फूड खाण्याच्या अपरिहार्यतेवर घाव घालता येऊ शकतो. या आधी सरकारनं शाळा परिसरात जंक फूडला बंदी केली होती, त्यानं फारसा काही फरक पडलेला जाणवत नाही. आता यूजीसीनं जंक फूड सेंटर बंद करण्याचा बडगा उगारून काहीही होणार नाही.
 - त्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे.

यूजीसीने नुस्ता बडगा उगारू नये, हे करावं..


*  देशात जेएनयू व हैदराबाद सेण्ट्रल युनिव्हर्सिटी मेस क्वालिटी कण्ट्रोलमध्ये आदर्शवत आहेत. यूजीसीनं अशा पद्धतीनं सबसीडाइज्ड मेस विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरू कराव्यात.
*  व्यावसायिक कंत्नाटदारांना ठेका देण्याऐवजी ना नफा ना तोटा तत्त्वावर सेवाभावी संस्थांना मेसचं कंत्नाट दिलं जाऊ शकतं.
* कमवा शिका योजनेतून विद्याथ्र्याच्या मदतीनं एखादी मेस उभारता येऊ शकते.
* मुंबईत टीआयएसएस (गोंवडी), आयआयटी (पवई), आयसीटी (माटुंगा) क्वालिटी मेससाठी प्रसिद्ध आहेत. विद्याथ्र्याकडून पुरेसा पैसा घेऊन उत्तम दर्जाचं जेवण मेसमधून देता येऊ शकतं, हे या संस्थांनी उदाहरणातून दाखवून दिलं आहे.
* मुंबईत स्ट्रीट फूड म्हणून पोळी-भाजी, वरण-भात, राईस प्लेट अगदी तीस-पस्तीस रुपयांत मिळते. असे परवडणार्‍या दरातल्या सकस अन्नाचे स्टॉल ठिकठिकाणी सुरू करता येऊ शकतात.
*   पुण्यातही तुरळक ठिकाणी हमाल पंचायतीद्वारे कष्टाची भाकर केंद्रं चालवली जातात. त्यांची संख्या वाढवता येऊ शकते. विद्यापीठ, कॉलज परिसरात अशी सेंटर्स सुरू करता येऊ शकतात.
* ठिकठिकाणी झुणका भाकर केंद्र पुन्हा एकदा स्थापन केली जाऊ शकतात. महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली तर बचत गटाच्या माध्यामातून असे पर्याय उभे राहू शकतात. 

घराबाहेर राहणार्‍या मुलांनी शोधलेल्या आयडिया


*  रूम/घरातून निघताना एखादी पोळी-ऑम्लेट तयार करून बॅगमध्ये टाकता येऊ शकतं.
*  शेवया फोडणी देऊन किंवा वाफ देऊन बाहेर निघताना टिफिनमध्ये टाकता येऊ शकतात.
*   टी-मेकर जवळ बाळगल्यास त्यात दूध तापवून किंवा रात्नी अंडी उकडून खाता येतात.
*  गावाकडून जाताना सुक्या भाकरी, शेंगदाण्याची चटणी घेऊन जाता येऊ शकते.
*  आर्थिक सुबत्तेनुसार खारिक, सुकामेवा खिशात बाळगता येऊ शकतो.
*  कुणीही शेंगदाणे अगदी सहज खरेदी करू शकतो. एकावेळी शंभर ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं पोट भरतं.
*   डझनभर केळी बॅगमध्ये घेऊन ठेवल्यास दिवसभर पुरतात.
*   सफरचंद, पेरू यासारखी फळं पिझ्झा-बर्गरपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.
 


(लेखक मुक्त पत्रकार आहे.)


 

Web Title: Ban on junk food in the premises of university and higher educational institutions? What will happen next..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.