पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:36 IST2025-11-17T12:35:16+5:302025-11-17T12:36:15+5:30
उत्तर विभाग महिला संघाला नमविले

पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार
कोल्हापूर : बीसीसीआयतर्फे नागालॅड येथे झालेल्या वरिष्ठ आंतरविभागीय महिला टी-२० ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभाग महिला संघाने उत्तर विभाग महिला संघाला २५ धावांनी मात करुन अजिंक्यपद पटकाविले.
कोल्हापूरची अनुजा पाटील हिच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकाविले. पश्चिम विभाग महिला संघाने पाच पैकी चार सामन्यांत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने उत्तर विभाग महिला संघाविरुद्ध प्रथम फलदांजी करताना २० षटकांत ४ बाद १६९ धावा केल्या. त्यात हुमारिया काझी ५८, तेजल हसबनीस ४३, किरण नवगिरे ३४ आणि कर्णधार अनुजा पाटीलने २२ धावा केल्या.
उत्तरादाखल खेळताना उत्तर विभाग महिला संघाने २० षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. पश्चिम संघाकडून अनुजा पाटील, सीमा ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पश्चिम संघाने २५ धावांनी विजय मिळविला.
स्पर्धेत अनुजाने अष्टपैलू कामगिरी केली. अंतिम फेरीपूर्वी झालेल्या सामन्यात तिने ११८ धावा आणि ११ बळी घेतले. या हंगामात डब्लूएमपीएल, वरिष्ठ महिला टी-२० आणि वरिष्ठ महिला आंतर विभागीय टी-२० या तिन्ही स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे.