अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 20:08 IST2024-08-15T19:48:41+5:302024-08-15T20:08:37+5:30
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर विनेश फोगटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर
Vinesh Phogat : आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटने ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरविण्याविरुद्ध केलेले अपील बुधवारी फेटाळले आहे. या निर्णयाने विनेशसह सर्व भारतीयांची मोठी निराशा झाली आहे. या निर्णयामुळे विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याचा मार्ग बंद झाला. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर विनेशची पहिली पोस्ट समोर आली आहे. विनेशच्या या पोस्टमुळे क्रीडा रसिकही भावुक झाले आहेत.
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने सगळ्या देशाला प्रचंड दुःख झालंय. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीपूर्वी विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आले. अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे दिसून आले. अपात्र ठरवल्यानंतर विनेशने अंतिम सामना खेळण्यासाठी आणि रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे अपील केले होते. मात्र दोन्ही निर्णयावर विनेशच्या हाती निराशा आली. त्यानंतर आता विनेशने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कुस्तीपटू विनेश फोगटने अपात्रतेनंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील केले होते. मात्र विनेशचे अपील फेटाळण्यात आले. हे अपील फेटाळल्याने रौप्यपदकाची आशाही मावळली. आता या प्रकरणानंतर विनेशने एक पोस्ट शेअर केली आहे. विनेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विनेश मॅटवर डोळ्यांवर हात ठेवून अश्रू लपवत आहे. यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये बी प्राकचं गाणं वाजतंय. गाण्याच्या बोलानुसार सर्व मेहनत करूनही विनेशला तिच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नसल्याचे वाटत आहे. या फोटोवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.
विनेशने या भावनिक पोस्टवर कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. पण अनेक चाहत्यांनी विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट केल्या आहेत. भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राने कमेंटमध्ये "तू प्रेरणादायी आहेस, तू कौतुकास पात्र आहात. तू भारताचे रत्न आहेस, असं म्हटलं आहे. तसेच बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने लगेचच विनेश फोगटच्या पोस्टवर कमेंट करून लोकांचे मन जिकलं आहे. "तू आमचं खरं सोनं आहेस, चॅम्पियन आहेस," असं हुमा कुरेशीने कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.