भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं रचला नवा इतिहास; जे 'फुलराणी'ला जमलं नाही ते तिने करून दाखवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:36 IST2026-01-22T15:33:58+5:302026-01-22T15:36:05+5:30
बॅडमिंटन जगतात अशी कामगिरी करणारी सहावी महिला खेळाडू

भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं रचला नवा इतिहास; जे 'फुलराणी'ला जमलं नाही ते तिने करून दाखवलं
भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सध्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील प्री-क्वार्टर फायनल सामन्यात डेन्मार्कच्या लाइन होजमार्क कजेरफेल्ड हिला सरळ सेटमध्ये पराभूत करत सिंधूनं पुढच्या फेरीत प्रवेश केला. या विजासह तिने नवा इतिहास रचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिंधूची ऐतिहासिक कामगिरी, जे 'फुलराणी'लाही जमलं नाही ते करुन दाखवलं
इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. पहिला सामना जिंकण्यासाठी तिला चांगलीच मेहनत घ्यावी लागली होती. मात्र प्री-क्वार्टर फायनलमध्ये मिळालेला हा विजय सिंधूसाठी ऐतिहासिक ठरला. जे फुलराणी सायना नेहवाल हिला जमलं नाही ते पीव्ही सिंधूनं करून दाखवलं आहे. पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीतील ५०० सामने जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
बॅडमिंटन जगतात अशी कामगिरी करणारी सहावी महिला खेळाडू
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेतील प्री-क्वार्टर फायनलमध्ये सिंधूने अवघ्या ४३ मिनिटांत प्रतिस्पर्धीत खेळाडूचा खेळ खल्लास केला. या लढतीत तिने पहिला सेट २१-१९ आणि दुसरा सेट २१-१८ असा आपल्या नावे करत आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक पल्ला गाठला. महिला बॅडमिंटन एकेरीत ५०० सामने जिंकणारी ती बॅडमिंटनच्या कोर्टवरील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. बॅडमिंटन जगतात असा पराक्रम करणारी ती सहावी महिला खेळाडू आहे.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती अन् बरंच काही
पी. व्ही. सिंधूनं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक अविश्वनिय स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. २०१६ मध्ये तिने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कांस्य पदकाला गवसणी घेतली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. २०१९ मध्ये पी. व्ही. सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आपली छाप सोडली होती. ही स्पर्धा जिंकणारी ती भारताची पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे.