The 'Mumbai-Sri' Bodybuilding Contest will be held on February 29 | येत्या २९ फेब्रूवारीला रंगणार 'मुंबई-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा
येत्या २९ फेब्रूवारीला रंगणार 'मुंबई-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा

मुंबई - मुंबईतीलशरीरसौष्ठवपटूंसाठी ऑस्कर असलेल्या मुंबई श्रीचा तोच राजेशाही थाट आणि तोच रूबाब यंदाही कायम असेल. अवघ्या भारतात आर्थिक मंदीचे सावट असताना सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवलेल्या मुंबई श्रीचे दिमाखदार आयोजन येत्या २९ फेब्रूवारीला करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरूषांच्या शरीरसौष्ठवाचे एकंदर ९ गट आणि फिजीक स्पोर्टसचे दोन गट खेळतील. त्याचप्रमाणे महिलांच्या शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टसच्याही एकेका गटाची स्पर्धा रंगेल.

एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल असे आयोजन गेले काही वर्षे मुंबई श्रीचे केले जात आहे. यंदाही बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने मुंबई श्रीचा तोच दर्जा कायम राखण्यासाठी तीन महिन्यांपासून दंडबैठका मारायला सुरूवात केली. या वर्षापासून मुंबई श्रीचे आयोजन स्वत: संघटनाच घेणार असल्यामुळे सारे संघटक स्पर्धेला आर्थिक श्रीमंती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 

विजेत्याला सव्वा लाख, एकूण आठ लाखांची रोख बक्षीसे

भारतातील सर्वात प्रतिष्ठेची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा. गेल्या दहा वर्षांची परंपरा पाहाता मुंबई श्री म्हणजे सर्वात श्रीमंत जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा. मुंबई श्रीची जी प्रतिमा मुंबईकरांच्या मनात आहे तशीच प्रतिमा यंदाही कायम ठेवण्याचा मानस असल्याचे उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी बोलून दाखविला. भारतातील सर्वात श्रीमंत जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा असलेल्या "मुंबई श्री"मध्ये एकूण आठ लाख रूपयांच्या रोख पुरस्कारांचा विजेत्यावर वर्षाव केला जाणार आहे. या स्पर्धेचा विजेता सव्वा लाखाचा मानकरी ठरले तर उपविजेता ५० हजार रूपयांचे इनाम मिळवेल. गटातील अव्वल सहा क्रमाकांना १२, १०, ८, ६, ४ आणि २ हजार रूपयांची रोख बक्षीसे तसेच अव्वल तिघांना पदके देणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी जाहीर केले. तसेच बेस्ट पोझर आणि प्रगतीकारक खेळाडूलाही दहा हजारांचे रोख इनाम दिले जाणार आहे. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेप्रमाणे फिजीक स्पोर्टस् प्रकारतल्या तिन्ही गटांना समान रोख इनाम दिले जाईल. त्याशिवाय महिलांच्या शरीरसौष्ठव गटातील अव्वल सहा खेळाडूंना रोख पुरस्कार आणि पदकांनी सन्मानित केले जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.

जेतेपदासाठी पीळदार स्नायूंमध्ये चकमक

मुंबईतील अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडूसुद्धा या स्पर्धेत उतरणार आहेत, फक्त ते महाराष्ट्र श्रीच्या निवड चाचणीसाठी मुंबई श्रीच्या मंचावर दिसतील. पण "स्पार्टन न्यूट्रीशन मुंबई श्री"साठी खरी चकमक होणार आहे भास्कर कांबळी, सुशांत रांजणकर, उमेश गुप्ता, सुशील मुरकर, सुजीत महापात्रा, राहुल तर्फे, महेश राणे, रोहन गुरव, सकींदर सींग, संतोष भरणकर या सारख्या खेळाडूंमध्ये. या तयारीतील खेळाडूंचे जेतेपद दरवर्षी हुकत आले आहे. मात्र यंदा हे सारे  किताबासाठी आपला दावा ठोकतील. याही वर्षी स्पर्धेला विक्रमी दोनशेच्या आसपास खेळाडू येण्याची शक्यता असल्यामुळे सेलिब्रेशन क्लबमध्ये २९ फेब्रूवारीला पीळदार क्रीडासागर उसळला तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे स्पार्टन न्यूट्रीशन मुंबई श्रीसाठी पुन्हा एकदा तुंबळ युद्ध पाहायला मिळेल, असा विश्वास उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे यांनी व्यक्त केला. या स्पर्धेतूनच ०७ मार्चला सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबई व उपनगर या दोन संघांची निवड केली जाणार आहे. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ०९.३० वाजता स्पर्धेची वजन तपासणी आणि सायंकाळ ०४ वाजल्यापासून प्राथमिक फेरी  सेलिब्रेशन स्पोर्टस क्लबमध्ये होईल, अशीही माहितीही शेगडे यांनी दिली. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश सावंत (9867209971) ,सुनील शेगडे (9223348568), प्रभाकर कदम (8097733992), विजय झगडे (9967465063 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष खानविलकर यांनी केले आहे.

Web Title: The 'Mumbai-Sri' Bodybuilding Contest will be held on February 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.