Kho-Kho Competition: The winning streak of both teams of Maharashtra | खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

सूरत: खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व गुजरात खो-खो असोसिएशन आयोजित वीर नर्मद साऊथ गुजरात युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उधाणा मोगडुला रोड, सुरत, गुजरात येथे 39 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्राला कुमारांच्या गटात मणीपुर, ओडिसा, उत्तराखंड व दादरा-नगर हवेली या संघाबरोबर साखळी फेरीत लढावं लागणार आहे तर मुलींच्या गटात गतविजेत्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश, गोवा, त्रिपुरा व दादरा-नगर हवेली या संघाबरोबर लढत द्यावी लागणार आहे.

आज झालेल्या कुमारांच्या सामन्यात महाराष्ट्राने ओडिसाचा 16 - 9 असा एक डाव 7 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या नरेंद्र कातकडेने तीन मिनिटं तीस सेकंद संरक्षण केल, चंदू चावरेने नाबाद तीन मिनिटे दहा सेकंद पळतीचा खेळ केला, रामजी कश्यपने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करताना पाच गडी बाद केले व सौरव आहिरने दोन मिनिटं तीस सेकंद संरक्षण करत दोन गडी बाद केले तर जवळजवळ एकतर्फी ठरलेला या सामन्यात ओरिसाच्या संजय मंडलने एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केल व अर्जुन सिंगने चार गडी बाद करताना जोरदार खेळ करण्याचा प्रयत्न केला मात्र अनुभवी महाराष्ट्राच्या समोर ओडीसाचा निभाव लागू शकला नाही.

आज झालेल्या मुलींच्या सामन्यात महाराष्ट्राने शेजारच्या गोव्याचा 18 - 3 असा एक डाव 15 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात अनुभवी महाराष्ट्राच्या नऊ क्रमांकाच्या जानवी पेठेने चार मिनिटे संरक्षण करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला. तिला उत्कृष्ट साथ दिली ती ऋतुजा भोरने, तिने तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करतात महाराष्ट्राला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. रितिका मगदूम व गौरी शिंदेने प्रत्येकी तीन- तीन गडी बाद केले व महाराष्ट्राचा विजय जवळ निश्चित केला तर सहा क्रमांकाच्या रेशमा राठोडने 2:50 मिनिटे संरक्षण करत दोन खेळाडू बाद करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तर गोव्याची करिष्मा वेळीपने 1:00 संरक्षण करून गोव्यासाठी लढा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या  इतर खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्याने गोव्याला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

 कुमारांच्या इतर सामन्यांमध्ये कोल्हापूरने पश्चिम बंगालचा पाच मिनिटे पन्नास सेकंद राखून 01 गुणाने पराभव केला, उत्तराखंडने दादरा-नगर हवेलीचा एकडाव 21 गुणांनी पराभव केला, केरळने मध्य भारतचा एक डाव 02 गुणांनी पराभव केला तर तामिळनाडूने बिहारचा एक डाव 16 गुणांनी पराभव करत सामन्यातील रंगत कायम ठेवली आहे.

Web Title: Kho-Kho Competition: The winning streak of both teams of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.