खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या कीर्ती भोईटेने २१ वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी स्नेहा जाधवने २१ वर्षांखालील गटातील हातोडाफेकीत रौप्यपदक पटकाविले.   भोईटेने उत्कंठापूर्ण लढतीत अन्य खेळांडूंवर निसटता विजय मिळवताना २०० मीटर्सचे अंतर २४.९९ सेकंदांत पार केले. 

''मी नुकत्याच झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. त्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले होते. प्राथमिक फेरीत मी प्रथम क्रमांक घेतला होता. त्यामुळे अंतिम फेरीतही प्रथम क्रमांकाची खात्री होती. अंतिम शर्यतीसाठी मी खूप मेहनत घेतली होती. त्याचा फायदा झाला. अर्थात शेवटच्या २० मीटर्समध्ये पायात गोळा आल्यामुळे अपेक्षेइतकी वेळ मी नोंदवू शकले नाही. माझ्या या विजेतेपदाचे श्रेय माझ्या पालकांना आणि माझ्या प्रशिक्षकांना द्यावे लागेल,'' असे कीर्तिने सांगितले.

हातोडाफेकीत रौप्यपदक मिळविणारी स्नेहाने येथील स्पर्धेत सहा थ्रोमध्ये ५०.५७ मीटर्स अशी कामगिरी केली. सहा थ्रोपैकी पाच थ्रोमध्ये तिचे फाऊल झाले. जो एकच थ्रो तिने टाकला, तो रौप्यपदकासाठी पात्र ठरला. ती कराडची खेळाडू असून तिला दिलीप चिंचकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. वेणुताई चव्हाण महाविद्यालयात ती शिकत असून कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळविले होते.

''या स्पर्धेत पदकाचा आत्मविश्वाास होता. ५० मीटर्सपेक्षा जास्त चांगली कामगिरी करण्याबाबत मी आशावादी होते. तरीही पाच वेळा फाऊल झाल्यामुळे थोडीशी निराश झाले. रौप्यपदकदेखील माझ्यासाठी महत्त्वाची व समाधानकारक कामगिरी आहे,'' असे स्नेहा जाधवने सांगितले.

मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकरने २०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले. तिला हे अंतर पार करण्यास २५.२४ सेकंद वेळ लागला. ती सातारा येथे बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. यंदाच्या मोसमात तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये याच क्रीडा प्रकारात एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले आहे.

मुलांच्या २१ वर्षांखालील गटात नाशिकच्या प्रसाद अहिरे याला २०० मीटर्स धावण्यामध्ये ब्राँझपदक मिळाले. त्याने हे अंतर २१.६५ सेकंदात पूर्ण केले. तो सिद्धार्थ काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.

Web Title: Khelo India 2020 : Kirti bhoite win gold in 200 mtr race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.