Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 00:13 IST2025-07-12T00:04:16+5:302025-07-12T00:13:55+5:30

सिनरसमोर जोकोविच ठरला हतबल! ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत झाली एकतर्फी 

Jannik Sinner Beats Novak Djokovic To Set Up Maiden Wimbledon Final 2025 With Carlos Alcaraz | Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल

Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल

Jannik Sinner Beats Novak Djokovic To Set Up Maiden Wimbledon Final : विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इटलीचा नंबर वन टेनिस स्टार यानिक सिनर याने विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न घेऊन कोर्टवर उतरलेल्या नोव्हाक जोकोविचला मोठा धक्का दिला आहे.  २३ वर्षीय यानिक सिनरनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत जोकोविचला सरळ सेटमध्ये (६-३, ६-३, ६-४) पराभूत करत पहिल्यांदाच विम्बल्डनची फायनल गाठण्याचा डाव साधला आहे.

सिनरसमोर जोकोविच ठरला हतबल! ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत झाली एकतर्फी 

सात वेळचा विम्बल्डन चॅम्पिनयन आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीत २४ वेळा ग्रँडस्लम स्पर्धा गाजवणाऱ्या नोव्हाक जोकोविचसमोर सिनरनं सर्वोत्तम खेळ केला. जोकोचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत त्याने एकतर्फी केली. आता जेतेपदासाठी अंतिम सामन्यात सिनरसमोर गत चॅम्पियन आणि टेनिस जगतातील दुसऱ्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझचं आव्हान असेल.

मेडिकल टाइम आउटनंतर जोकोविच मॅचमध्ये आला, पण... 

यानिक सिनर याने या लढतीत जबरदस्त सुरुवात करताना पहिल्या दोन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचला बॅकफूटवर ढकलले. कमालीचा वेग अन् ताकदीनं फटके मारत इटालियन टेनिसपटूनं सर्बियन स्टारला पहिल्या दोन सेटमध्ये ६-३, ६-३ असे मागे टाकले. यानिक सिनरनं पहिल्या दोन सेटमध्ये दाखवलेला खेळ पाहता जोकोविचसाठी हा सामना अधिक आव्हानात्मक झाला होता. मेडिकल टाइम आउटनंतर जोकोविच याने दमदार कमबॅक करत तिसऱ्या सेटमध्ये आघाडी मिळवली. पण यानिक सिनर याने या सेटमध्ये पुन्हा ३-३ बरोबरी साधत जोकोविचसमोर पुन्हा आव्हान निर्माण केले. शेवटी हा सेट ६-४ असा जिंकत त्याने मॅच आपल्या नावे केली. 

स्नायू दुखापतीमुळे त्रस्त दिसला जोकोविच

३८ वर्षीय नोव्हाक जोकोविच याने आतापर्यंत ७ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून रोजर फेडरची बरोबरी करण्यासोबतच विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरण्याची संधी त्याच्याकडे होती.  हे स्वप्न घेऊनच तो या स्पर्धेत उतरला होता. पण हे स्वप्न इटालीयन टेनिस स्टारनं धुळीस मिळवलं. एकतर्फी पराभवामुळे जोकोविचच्या विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाची उत्सुकता लागून असलेल्या चाहत्यांचीही घोर निराशा झाली. उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत जोकोविच कोर्टवर पाय घसरुन पडला होता. यावेळी झालेली दुखापतीही त्याच्या खेळावर परिणाम करणारी ठरली. ग्रोइंग इंज्युरीमुळे कोर्टवर हालचाल करताना तो संघर्ष करताना दिसला. त्याची ही उणीव हेरून सिनरनं वेगवान खेळ करत त्याला खिंडीत पकडले अन् सामना एकहाती जिंकला.    


 

 

Web Title: Jannik Sinner Beats Novak Djokovic To Set Up Maiden Wimbledon Final 2025 With Carlos Alcaraz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.