चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:42 IST2025-11-25T05:41:54+5:302025-11-25T05:42:26+5:30
Kabaddi News:नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.

चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
ढाका - नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.
अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. मध्यंतराला २०-१६ अशी आघाडी घेत वर्चस्व राखल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत चायनीज तैपईला पुनरागमनाची संधी दिली नाही. चढाई आणि पकडीमध्ये शानदार कौशल्य दाखवत भारतीयांनी चायनीज तैपईचे मानसिक खच्चीकरण केले. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या आक्रमक चढाया भारतासाठी निर्णायक ठरल्या. एकवेळ चायनीज तैपईने लोण चुकवताना १२-९ अशी आघाडी मिळवली. परंतु, संजूच्या एका दमदार चढाईच्या जोरावर भारताने बरोबरी साधली आणि यानंतर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली.
१३ वर्षांनी आयोजन
महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आले. याआधी, पाटणा येथे २०१२ साली पहिली महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा रंगली होती. त्यावेळी भारताने अंतिम सामन्यात इराणला २५-१९ असे नमवून पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते.
पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा २००४, २००७ आणि २०१६ अशी तीनवेळा आयोजित झाली असून, तिन्ही वेळा भारतानेच बाजी मारताना अंतिम सामन्यात इराणला पराभूत केले.
अ गटात अव्वल स्थान पटकावत भारतीय महिलांनी बांगलादेश, थायलंड, युगांडा आणि जर्मनी यांना नमवले. यानंतर उपांत्य फेरीत इराणचे तगडे आव्हान ३३-२१ असे परतवून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती.