आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताने जिंकली दोन्ही विजेतेपदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 08:02 PM2019-12-05T20:02:16+5:302019-12-05T20:03:39+5:30

प्रशांतने ही लढत थेट २५-२१ आणि २५-०७ अशी जिंकली.

India won both the championships in the International Carrom competition | आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताने जिंकली दोन्ही विजेतेपदे

आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताने जिंकली दोन्ही विजेतेपदे

googlenewsNext
ठळक मुद्देभारताला दुसर्‍या एकेरीमध्ये झहीर पाशाने विजय मिळवून देताना शाहिद ईल्मीचा २५-१० आणि २५-१६ असा पाडाव केला.

पुणे ः विश्‍वविजेते प्रशांत मोरे आणि एस अपूर्वा यांच्या अप्रतिम खेळाच्या बळावर भारताने अनुक्रमे श्रीलंका आणि मालदीवसवर ३-० असे सफाईदार विजय नोंदवत ८ व्या आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला या दोन सांघिक किताबांवरील आपला कब्जा कायम ठेवला. ही स्पर्धा पुण्याच्या पी वाय सी जिमखान्यावर सुरु असून कॅरमच्या पाठीराख्याना आज अव्वल दर्जाचा खेळ पाहावयास मिळाला. पुरुष स्पर्धेच्या एकेरीमध्ये प्रशांत आणि निशांत फर्नांडो (२०१२ चा विश्‍वविजेता) यांच्यातली लढत चांगलीच रंगली. अखेरीस प्रशांतने ही लढत थेट २५-२१ आणि २५-०७ अशी जिंकली असली तरी निशांतने त्याला चांगलेच झुंजविले. भारताला दुसर्‍या एकेरीमध्ये झहीर पाशाने विजय मिळवून देताना शाहिद ईल्मीचा २५-१० आणि २५-१६ असा पाडाव केला. बांग्लादेशने मालदीवसला २-१ ने पराभव करून कांस्य पदक पटकाविले.

महिलांमध्येही रश्मी कुमारी या गत जगज्जेत्या खेळाडूला मालदीवसच्या अमिनाथ विधाध हिच्या विरुद्ध सुरवातीला संघर्ष करावा लागला. मात्र रश्मीने सुरुवातीला २५-१० अशी आघाडी प्रस्थापित केल्यानंतर अमिनाथचा २५-० असा दुसर्‍या सेटमध्ये धुव्वा उडविला. विश्‍वविजेती अपूर्वा समोर अमिनाथ विषमा पूर्णपणे विष्प्रभ ठरली. अपूर्वाने हा सामना २५-५, २५-५ असा जिंकला. दुहेरीत आयेशा साजिद आणि के नागज्योती या भारतीय जोडीने मालदीवसच्या अमिनाथ सुबा आणि ङ्गातिमथ रायना यांचा २५-८ आणि २५-१४ असा पराभव केला. विजयी भारताचा महिला संघ १. एस. अपूर्वा  २. रश्मि कुमारी  ३. आयेशा साजीद  ४. के. नागज्योती ५ . अनुपमा केदार (संघ व्यवस्थापक) ६. मारीया इरूदयम (प्रशिक्षक)

तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात श्रीलंकाच्या महिला संघाने बांग्लादेशला ३-० असा पराभच करून कांस्य पदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेला आयुर्विमा महामंडळ, ओ एन जी सी, इंडियन ऑईल हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक कंपन्यांकडून पाठबळ लाभले आहे.

प्रशांत मोरेने पहिल्या सेटमध्ये ५ व्या बोर्डाअखेर १७-५ अशी आघाडी घेतली खरी पण निशांतने ८ व्या बोर्डाअखेर त्याला २१-२१ असे गाठले. त्याने सातवा बोर्ड दहा गुणांनी जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये प्रशांतने ९ गुणांचा मोठा बोर्ड मारण्याची संधी घालवल्याने तो काहीसा लांबला पण प्रशांतने प्रतिस्पर्ध्याला केवळ एकदाच क्वीन घेऊ देत त्याच्या स्कोअरिंगला खीळ घातली. २५-७ हा फरक जरा मोठा दिसत असला तरी दोघांमध्ये संघर्ष झाला.

झहीर पाशा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय तो आज आपला सातवा ब्रेक टूफिनिश करू शकला. याआधी त्याने वैयक्तिक एकेरी आणि स्विस लीग मध्ये अर्ध्या डझन वेळा ही किमया साधली होती.

राजेश गोहिल आणि इर्शाद अहमद यांनी दुहेरीमध्ये दिनेथ दुलक्षणे आणि अनास अहमद यांचा २५-१४ आणि २५-४ असा फडशा उडवला. त्यांनी पहिल्या सेटमध्ये अकरा गुणांचे दोन बोर्ड मारले तर दुसर्‍यामध्ये दहा आणि नऊ गुणांचे दोन बोर्ड मारत आपले वर्चस्व दाखवून दिले. विजयी भारताचा संघ १. प्रशांत मोरे २. जहीर पाशा ३. इर्शाद एहमद ४. राजेश गोइल ५. मारीया इरूदयम (प्रशिक्षक व व्यवस्थापक)

आजपर्यंत सोळा ब्रेक टू फिनिशची नोंद झाली असून त्यापैकी एकट्या जहीर पाशाने ही किमया सात वेळा केली. याशिवाय दहा ब्लॅक टू फिनिश पहावयास मिळाले. या प्रतिष्ठीत आंतराष्ट्रीय चषक कॅरम स्पर्धेत एकाच वेळी ४४ आंतरराष्ट्रीय दर्जेचे सिनको कॅरम बोर्ड व सिसका स्पेशल एडीशन लेजंड कॅरम सोंगट्या वापरण्यात येत आहे.

महत्वपूर्ण निकाल

महिला सांघिक गट - अंतिम फेरी भारत वि. वि. मालदीव

एस. अपूर्वा वि. वि. अमिनाथ विषम - २५-०५, २५-०५

रश्मी कुमारी वि. वि. अमिनाथ विधाध - २५-१०, २५-०

आयशा साजिद / के. नागज्योती वि. वि. अमिनाथ सुबा / फातीमात रायना - २५-८, २५-१४

तिसरे स्थान ः श्रीलंका विजयी विरुद्ध बांग्लादेश ३-०

 

पुरुष सांघिक गट - अंतिम फेरी भारत वि. वि. श्रीलंका ३-०

जहीर पाशा वि. वि. शाहीद इल्मी - २५-१०, २५-१६

प्रशांत मोरे वि. वि. निशांत फर्नांडो - २५-२१, २५-०७

इर्शाद एहमद / राजेश गोईल वि. वि. दिनेश दुलक्षणे /अनास अहमद- २५-१४, २५-०४

तिसरे स्थान ः बांग्लादेश वि. वि. मालदीव २-१

Web Title: India won both the championships in the International Carrom competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत