मी अनेक ‘सेंच्युरी’ केल्या आहेत
By Admin | Updated: June 17, 2015 01:42 IST2015-06-17T01:42:57+5:302015-06-17T01:42:57+5:30
एमसीएतील माझ्या कार्याबद्दल म्हणत असाल तर मी अनेक सेंच्युरी केल्या असून अध्यक्षपदावर कार्यरत असताना माझा स्कोअर नेहमीच चांगला झाला आहे,

मी अनेक ‘सेंच्युरी’ केल्या आहेत
मुंबई : एमसीएतील माझ्या कार्याबद्दल म्हणत असाल तर मी अनेक सेंच्युरी केल्या असून अध्यक्षपदावर कार्यरत असताना माझा स्कोअर नेहमीच चांगला झाला आहे, असे सांगत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शाब्दिक ‘बाउन्सर’ला फटकावले.
सोमवारी क्रिकेट फर्स्ट गटाच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते, की आज सुनील गावसकरपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळेच रिटायर्ड झालेले असताना आमचे अध्यक्ष मात्र रिटायर्ड होत नाहीत. शिवाय त्यांचा स्कोअरदेखील शून्यच आहे. यावर पवार यांनी मंगळवारी एमसीए कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांना चोख उत्तर दिले.
शेषराव वानखेडे यांनी वानखेडे स्टेडियम बांधले. याच ठिकाणी असलेले क्रिकेट सेंटर हे एमसीएसोबतच बीसीसीआयचेही मुख्यालय आहे. देशातील पहिली बंदिस्त क्रिकेट अकादमी वांद्रे - कुर्ला संकुल येथे उभारली. याचप्रकारचे बांधकाम कांदिवली येथे केले. आता ठाण्यातदेखील याच प्रकारच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असून, आमचा हा ‘स्कोअर’ वाढतच आहे. त्यामुळे माझ्या कारकीर्दीमध्ये मी सेंच्युरी नाही, तर ‘डबल सेंच्युरी’ झळकावली आहे, अशा शद्बांत पवार यांनी ठाकरे यांच्या ‘बोलंदाजी’चा समाचार घेतला.
मी आजपर्यंत कधीही खेळामध्ये राजकारण केले नाही. ३० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये मी क्रिकेटव्यतिरिक्त महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन, कबड्डी, खो-खो व कुस्ती या राज्य संघटनांचेदेखील अध्यक्षपद भूषविले. प्रत्येक ठिकाणी मी कायम खेळाचाच विचार केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा एकत्र आले, असा अर्थ होत नाही. मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, पुन्हा एकदा डी. वाय. पाटील स्टेडियमविषयी भूमिका मांडताना पवार म्हणाले की, वानखेडे स्टेडियमचे नूतनीकरण सुरू असताना आयसीसीच्या मदतीने डीवाय स्टेडियमवर एक आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्याचा निर्णय घेतला, मात्र पावसामुळे तो सामना झाला नाही. आयसीसी नियमानुसार क्रिकेट मैदानावर केवळ क्रिकेटच खेळवले गेले पाहिजे अन्यथा तेथे क्रिकेट सामने खेळवता येत नाहीत. मात्र या स्टेडियमवर क्रिकेटशिवाय फुटबॉल सामनेदेखील झाल्याने आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे.
क्रिकेट फर्स्ट गटाविषयी पवार म्हणाले की, ते आमचेच सहकारी असून पुढे आम्हाला त्यांच्यासोबतच काम करायचे आहे. त्यांना कमी लेखणार नाही.
(क्रीडा प्रतिनिधी)
आठवलेंचा पवार यांना पाठिंबा...
यंदाच्या निवडणूकीत थेट उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी सर्वांनाच चकीत केले होते. मात्र पवार यांनी आठवलेंची भेट घेत त्यांना माघार घेण्यास सांगून भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर आठवले यांनी माघार घेतली व आता त्यांनी पवार - म्हाडदळकर गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीत पवार-आठवले ‘भागीदारी’ महत्त्वाची ठरु शकते.