गोल्फादेवीचे विजेतेपद

By Admin | Updated: April 21, 2015 06:31 IST2015-04-21T06:31:08+5:302015-04-21T06:31:08+5:30

नावाजलेल्या गोल्फादेवी संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना चुरशीच्या झालेल्या सामन्यात तगड्या विजय क्लबला ८-४ असे रोखून नुकत्याच झालेल्या

Golpe Devi's title | गोल्फादेवीचे विजेतेपद

गोल्फादेवीचे विजेतेपद

मुंबई : नावाजलेल्या गोल्फादेवी संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना चुरशीच्या झालेल्या सामन्यात तगड्या विजय क्लबला ८-४ असे रोखून नुकत्याच झालेल्या कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह गोल्फादेवी संघाने १५ हजार रोख रुपयांच्या पारितोषिकावरही कब्जा केला.
नवोदित संघाच्या वतीने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. शेवटच्या ५ मिनिटांत शार्दुल हरचकरने एकाच चढाईत ३ गडी मारत सामना विजय क्लबच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुषार दुडीयेचा चतुरस्र खेळ आणि विवेक बिजम, दुर्वेश पाटील यांचे दमदार संरक्षण या जोरावर गोल्फादेवीने बाजी पलटवताना ४ गुणांनी विजेतेपद निश्चित केले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये विजय क्लबने झुंजार विजय मिळवताना कसलेल्या शिवशक्तीला २४-२२ असे नमवून अंतिम फेरी गाठली होती. सावध सुरुवात केलेल्या विजय क्लबने या सामन्यात मध्यांतरानंतर वेगवान खेळ केला. तर गोल्फादेवीने एकहाती वर्चस्व राखताना सहज आगेकूच करीत विजय बजरंग व्यायामशाळेचा २०-१२ असा पराभव केला होता. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Golpe Devi's title