विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा 'दे धक्का', सरदारसिंगचा हॉकीला 'अलविदा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:10 IST2018-09-12T22:20:55+5:302018-09-13T04:10:54+5:30

तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने क्राडी क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेपूर्वी नेदरलँडमध्ये जाऊन

Former India team captain De Dhakka, Sardar Singh's hockey 'goodbye' | विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा 'दे धक्का', सरदारसिंगचा हॉकीला 'अलविदा'

विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा 'दे धक्का', सरदारसिंगचा हॉकीला 'अलविदा'

नवी दिल्ली: भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणारा दिग्गज खेळाडू सरदारसिंग याने बुधवारी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली. ‘गेली १२ वर्षे मी सातत्याने खेळलो असून आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आहे,’ असे सरदारचे मत आहे.
‘आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर मी हा निर्णय घेतला असून कांस्य पदकावर समाधान मानणे हे माझ्यासाठी अपयशासारखेच होते. माझे वय देखील वाढत असून आधीसारखी चपळत राहिलेली नाही. आशियाडदरम्यान मला अनेकदा टीका सहन करावी लागली,’ असे सरदार म्हणाला.
‘१२ वर्षे खेळल्यानंतर आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पिढीकडे जबाबदारी सोपविण्याची हीच वेळ आहे. चंदीगडमधील कुटुंबीय, हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि चाहत्यांशी चर्चा केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. आता हॉकीपेक्षा अनेक गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे,’ असेही सरदारने सांगितले. विशेष म्हणजे जकार्ता आशियाई स्पर्धेच्याआधी सरदारने आपण टोकियो आॅलिम्पिक पर्यत खेळू अशी इच्छा व्यक्त केली होती.
हॉकी इंडियाने बुधवारी राष्टÑीय शिबिरासाठी २५ खेळाडूंची नावे जाहीर केली, त्यात सरदारचे नाव नव्हते. सरदारला निवृत्ती जाहीर करण्यास बाध्य करण्यात येत असल्याच्या वावड्या उठत होत्या. पण काही तासातच सरदारने निवृत्तीची घोषणा केली. संघाबाहेर केले काय, असे विचारताच त्याने उत्तर देण्याचे टाळले. शुक्रवारी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर करेन, इतकेच तो म्हणाला. तंदुरुस्तीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे त्याने फेटाळले.
हरियाणातील सिरसा येथील रहिवासी असलेल्या सरदारच्या करिअरला वादाचे गालबोटही लागले होते. भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. सरदारने मात्र आरोप सातत्याने फेटाळून लावले. या प्रकरणी लुधियाना पोलिसांच्या विशेष पथकाने सरदारला क्लीन चिट देखील दिली. (वृत्तसंस्था)
>सरदारचे करिअर
२००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात पदार्पण.
१२ वर्षांच्या करिअरमध्ये मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू.
३२ वर्षांचा सरदार देशासाठी ३५० आंतरराष्टÑीय सामने खेळला.
२००८ ते २०१६ दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर संघाने नेतृत्व पीआर श्रीजेशकडे सोपविण्यात आले.
२००८ मध्ये सुल्तान अझलान शाह चषकात भारताचे नेतृत्व करणारा सर्वांत युवा कर्णधार.
२०१२ मध्ये सरदारला अर्जुन पुरस्कार आणि २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कावर देऊन गौरविण्यात आले.
दोन आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू.
>सकारात्मक दृष्टीकोनातून नवी सुरुवात करणार - हरेंद्रसिंग
आशियाई स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, या अपयशाचे दु:ख आजही प्रशिक्षक हरेंद्र यांना आहे. मात्र अगामी आंतरराष्टÑीय स्पर्धेत सकारात्मक दृष्टीने नव्याने सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आशियाई स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता म्हणून सहभागी झाला होता. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले होते.
हरेंद्र म्हणाले, ‘आशियाई स्पर्धेत आम्ही अंतिम फेरीत पोहचू शकलो नाही, यासाठी कोणतीही सबब सांगणार नाही. आता मागे पाहण्यात काहीच अर्थ नाही. मात्र पुढील स्पर्धेत सकारात्मक दृष्टीने खेळणे महत्वाचे आहे.’ हॉकी इंडियाने बुधवारी राष्टÑीय शिबिरासाठी २५ खेळाडूंची निवड केली.


Web Title: Former India team captain De Dhakka, Sardar Singh's hockey 'goodbye'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.