दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:42 IST2019-09-16T20:40:31+5:302019-09-16T20:42:07+5:30
दुहेरी गटात कामगिरी, भारताला एकूण सहा पदके

दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक
पणजी : पदकांमागून पदके मिळवणाऱ्या गोव्याच्या तानिशाने पुन्हा एकदा सुवर्णमय धडाका दिला. दुबई इटरनॅशनल ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तानिशाने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली. त्यात तानिशाचे पदक गौरवास्पद ठरले.
तानिशा आणि आदिती भट ही जोडी पुन्हा चमकली. मुलींच्या दुहेरी गटात खेळतान या जोडीने भारताच्याच जोडीचा म्हणजे त्रिसा आणि वर्षिणी यांचा पराभव केला. अंतिम सामना रोमांचक होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तानिशा-आदितीने हा सामना २१-१७, २१-१७ अशा दोन गेमध्ये जिंकला. एकेरी गटात तसनीम मीर हिने किताब पटकाविला. मिश्र दुहेरीत तसनीम आणि राशिद यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित वरुण कपूरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला नेपाळच्या दुसºया मानांकित प्रिन्स दहलने अत्यंत रोमांचक सामन्यात २१-१९, २१-१९ ने पराभूत केले.
दरम्यान, गोव्याच्या तानिशाने सुवर्णपदकाची मोहीम कायम राखली. तानिशाने भारतात झालेल्या अखिल मानांकन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या होत्या. या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर तानिशाने विश्व ज्युनियर स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. आता दुबईतील स्पर्धा जिंकल्याने तानिशा या स्पर्धेतही देशाला पदक जिंकून देईल, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे. तानिशा आणि उत्तराखंडची तिची साथीदार आदिती भट यांनी सलग विजेतेपद जिंकून ज्युनियर गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.