चिलीचा डबल धमाका

By admin | Published: June 28, 2016 06:14 AM2016-06-28T06:14:48+5:302016-06-28T06:14:48+5:30

मेस्सीकडून निर्णायक क्षणी झालेल्या चुकीमुळे चिलीने अर्जेंटिनावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी मात करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

Chile's double explosion | चिलीचा डबल धमाका

चिलीचा डबल धमाका

Next


न्यूजर्सी : स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीकडून निर्णायक क्षणी झालेल्या चुकीमुळे चिलीने अर्जेंटिनावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी मात करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही अंतिम फेरीत चिली आणि अर्जेंटिना यांच्यात किताबी लढत झाली. निर्धारित ९० मिनिटांत कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतरच्या ३० मिनिटे एक्ट्राटाईममध्येही मुकाबला गोलशून्य बरोबरीतच राहिला. यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला. या वेळी खेळली गेलेली अंतिम लढतही गेल्या वेळच्या अंतिम लढतीप्रमाणेच झाली. त्या वेळीही चिलीने गोलशून्यने बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अर्जेंटिनाला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत जर्मनीकडून १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. दोन्हीकडून एकमेकांच्या गोलपोस्टवर धडाधड हल्ले चढवण्यात येत होते. यातून खेळाडूंमध्ये अनेक वेळा चकमकीही घडल्या. यामुळेच दोन्ही संघाला एकेक रेड कार्ड मिळाले.
>पेनल्टीचा थरार... अन् एका वादळाची अखेर...
एका मोठ्या सामन्याचा निकाल पेनल्टीवर लागणार होता, परंतु हा निकाल ऐतिहासिक ठरेल, असे त्याक्षणी कोणालाच वाटले नसेल. पहिली संधी चिलीला मिळाली, पण ती विडालने गमावली. अर्जेंटिनाला येथे चिलीवर दबाव टाकण्याची चांगली संधी निर्माण झाली, याचा फायदा घेण्यासाठी अर्जेंटिनाकडून अर्थातच लिओनेल मेस्सीसारखा दुसरा खेळाडू नव्हता.
मेस्सी ही पेनल्टी सहजपणे गोलमध्ये रूपांतरित करेल, असे सर्वांनाच वाटत होते, पण झाले भलतेच. मेस्सीचा फटका पोस्टबाहेर भरकटला अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. निराश मेस्सीच्या कारकिर्दीची ती अखेर ठरली. यानंतर चिलीकडून कॅसिलो, चार्ल्स एरेन्गुईज, जीन बीयुसेयोर आणि फ्रान्सिका सिल्वा यांनी गोल केले.
अर्जेंटिनाच्या मॅस्करानो आणि सर्गियो एग्युरो यांनी गोल नोंदवले. अर्जेंटिनाच्याच लुकास बिगलियाचा फटका चिली गोलकीपरने अडवला आणि चिलीच्या विजयाची नांदी झडली. सिल्वाने आपली पेनल्टी यशस्वी गोलपोस्टमध्ये धाडून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Chile's double explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.