Asian Games 2018: राष्ट्रकुल स्पर्धेची पुनरावृत्ती जकार्तामध्ये करणार, सुशील कुमारचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:11 IST2018-08-18T16:09:09+5:302018-08-18T16:11:25+5:30
Asian Games 2018: सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही.

Asian Games 2018: राष्ट्रकुल स्पर्धेची पुनरावृत्ती जकार्तामध्ये करणार, सुशील कुमारचा निर्धार
-अभिजीत देशमुख
(थेट जकार्ता येथून)
सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही. २००६च्या कतार आशियाई स्पर्धेत सुशीलने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळलाच नाही. जकार्ता मध्ये सुशील सुवर्णपदक जिंकेल का याची उत्सुकता लागली आहे.
'एप्रिलमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मी सुवर्णपदक पटकावले आणि मी सध्या फॉर्म मध्ये आहे. जकार्तामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करून सुवर्णपदक नक्की जिंकेन. मागील दोन आशियाई स्पर्धेत मी खेळू शकलो नाही आणि या स्पर्धेची मी खूप प्रतीक्षा केली आहे. मी कुठल्याही प्रतिस्पर्धी कमी लेखत नाही. मॅटवर गेल्यावर त्याला किती लवकर चीतपट करता येईल हाच विचार करत असतो,'असे सुशीलने सांगितले.
( Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की! )
बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 66 किलो गटात अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे आणि जकार्तामध्ये तो 74 किलो किलो वजनी गटात स्पर्धा करणार आहे. 'समीक्षकांनी काय बोलले आहे याची मला चिंता नाही. माझे लक्ष केंद्रित आहे आणि त्यांना प्रदर्शनाने उत्तर देईन. मी चाहत्यांचा आभारी आहे. मला नकारात्मकता आवडत नाही. मी नेहमीच आत्मविश्वास बाळगतो आणि त्याने मला सकारात्मक ऊर्जा मिळते. माझे कोच आणि सहकारी सकारात्मकतेवर विश्वास ठेवतात, त्याचा मला खूप मदत झाली,'असेही तो म्हणाला.
( Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!)
तो म्हणाला,'कुस्ती ताकद आणि चपळतेचा खेळ आहे. मी शिस्तबद्ध जीवन जगतो. यावेळी कुस्तीमध्ये भारताला कमीत कमी ३ सुवर्णपदक मिळतील.आशिया खंडात भारताचा दबदबा वाढत आहे, पुरुष प्रमाणेच महिलासुद्धा चांगल्या खेळत आहेत. सर्व मल्ल देशाचा गौरव वाढविण्यासाठी सज्ज आहेत, मी बजरंग पुनियाकडून सुद्धा सुवर्णपदकाची अपेक्षा करत आहे. प्रतिद्वंदीबद्दल विचाराल तर जपान व इराणचे मल्ल बलाढ्य आहेत.'