आदित्य मेहताचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 01:54 IST2015-06-16T01:54:26+5:302015-06-16T01:54:26+5:30

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आदित्य मेहताने एकतर्फी झालेल्या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना वरुण मदनचा ८-१ असा सहजपणे फडशा

Aditya Mehta championship | आदित्य मेहताचे विजेतेपद

आदित्य मेहताचे विजेतेपद

मुंबई : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आदित्य मेहताने एकतर्फी झालेल्या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना वरुण मदनचा ८-१ असा सहजपणे फडशा पाडून पहिल्या खुल्या प्रो स्नूकर सिरीज स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद उंचावले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ केलेल्या वरुणचा अंतिम सामन्यात आदित्यचा अनुभवासमोर काहीच निभाव लागला नाही.
वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे नुकताच पार पडलेल्या या अंतिम सामन्यात आदित्यने आपल्या लौकिकानुसार अचूक स्ट्रोकचा धडाका लावताना वरुणला विजयाची एकही संधी दिली नाही. पहिल्याच फ्रेममध्ये मोठ्या फरकाने बाजी मारून दणक्यात सुरुवात केल्यानंतर आदित्यने दुसऱ्या फ्रेममध्ये ११६ गुणांचा ब्रेक करून वरुणला दबावाखाली आणले.
यानंतरच्या दोन्ही फ्रेममध्येदेखील मोठ्या फरकाने बाजी मारताना आदित्यने बेस्ट आॅफ १५ फ्रेमच्या या मॅरेथॉन लढतीत ४-० अशी मजबूत आघाडी घेतली. त्याचवेळी पाचव्या फ्रेममध्ये वरुणने कडवा खेळ करताना आदित्यच्या चुकलेल्या प्रत्येक स्ट्रोकचा फायदा उचलून ६५-३१ अशा गुणांनी पहिला फ्रेम जिंकला. यामुळे त्याने आपली पिछाडी १-४ या गुणांनी कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा, मात्र यानंतर आदित्यने आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकून ८-१ अशा दणदणीत विजयासह विजेतेपदाला गवसणी घातली.
संपूर्ण सामन्यावर दबदबा राखलेल्या आदित्यने वरुणला कोणतीही संधी न देताना ७९(६२)-१४, १२३(११६)-११, ९३(४८)-२९, ७२-६, ३१-६५, १११(८४)-१३, १०२(८८)-२५, ६६-१५, ८१(८१)-८ असा दिमाखदार विजय मिळवला.
संपूर्ण स्पर्धेत अनुभवी धरमींदर लीली याने ११९ आणि १०० असे सर्वाधिक दोन शतकी ब्रेक
नोंदवले. त्याचवेळी आदित्यने
अंतिम सामन्यात नोंदवलेला एकमेव शतकी ब्रेक स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा ब्रेक ठरला. तसेच बलाढ्य पंकज अडवाणी (११४) आणि
लक्ष्मण रावत (१०२) यांनीदेखील शतकी ब्रेक नोंदवून आपली छाप पाडली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Aditya Mehta championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.