Traffic in school vans is unsafe | स्कूलव्हॅनमधील वाहतूक असुरक्षित, व्हॅनचालकांकडून नियमांची पायमल्ली

स्कूलव्हॅनमधील वाहतूक असुरक्षित, व्हॅनचालकांकडून नियमांची पायमल्ली

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल परिसरात स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने वाहतूक केली जाते. मात्र, या वेळी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॅनला आग लागण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. अनेक चालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याविषयी आरटीओकडून कडक कारवाई होत नसल्याने विद्यार्थी वाहतूक असुरक्षित बनू लागली आहे.
पनवेल परिसरात डीएव्ही, महात्मा, न्यू हॉरिझोन, कारमेल, सेंट जोसेफ, रायन, बालभारती, ग्रीन फिंगर्स, यासारख्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शाळा आहेत. लाखो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. काही ठिकाणी स्कूलबसची व्यवस्था आहे; परंतु अरुंद रस्ते, गल्यांमध्ये स्कूलबस जात नाहीत.
सिडको वसाहतींत जास्त शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कूलव्हॅनद्वारे शाळेत ने-आण केली जाते. स्कूलव्हॅन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात फारसे प्रबोधन नसते. अनेक वाहनचालकांच्या स्टेरिंगलगत तंबाखूच्या पुड्या
दिसून येतात, त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
व्हॅनमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सीटबेल्ट लावला जात नाही, तसेच वाहनचालकही सीटबेल्ट लावत नाहीत. चालक मोबाइलवर बोलत व्हॅन चालविताना दिसतात. तर काही जण हेडफोन लावून गाणी ऐकण्यात दंग असतात. यावरून चालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलव्हॅन चालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, या दृष्टिकोनातून परिवहन विभागाची नजर असते. यासाठी खास पथकही नेमण्यात आले असून, नियमित कारवाईही केली जाते. त्याचबरोबर व्हॅनचालकांमध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
- हेमांगिनी पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक
स्कूलव्हॅनमध्ये नियमानुसार सात अधिक एक, अशी आठ विद्यार्थ्यांची वाहतूक करणे अपेक्षित आहे; परंतु १२ ते १५ विद्यार्थ्यांची एकाच वेळी वाहतूक व्हॅनमधून केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे विद्यार्थी वाहतूक धोकादायक आहे. याबाबत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

पासिंगनंतर स्पीड गव्हर्नर काढण्याचे प्रकार
वेगमर्यादेकरिता परिवहन विभागाने सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती केली आहे. ती यंत्रणा बसवल्याशिवाय वाहनांची पासिंग केली जात नाही. स्कूलव्हॅनला अशाप्रकारे स्पीड गव्हर्नर बसवण्यात येतात. मात्र, पासिंग झाल्यानंतर चालक ती काढून टाकतात. त्यामुळे अनेकदा वेगमर्यादा ओलांडली जाते. कित्येकदा यामुळे अपघातसुद्धा करतात, तर वाहनांना कट मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Web Title: Traffic in school vans is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.