केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 22:05 IST2025-10-10T22:05:00+5:302025-10-10T22:05:38+5:30
Airoli Hospital Molestation News: ऐरोली सेक्टर-६ येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरने एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली.

केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
ऐरोली सेक्टर-६ येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरने एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली . या प्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर हा पीडित महिलेच्या मामाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पीडित महिला तणावात असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरने तिला केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने विरोध करताच आरोपीने जबरदस्तीने तिचे कपडे काढले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टर त्यावेळी दारूच्या नशेत होता.
त्यानंतर आरोपीने पीडिताचा फोन हिसकावून घेतला आणि स्वतःच्या फोनचा वापर करून पीडितेच्या पालकांशी संपर्क साधला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपीची मैत्रीण रुग्णालयात येईपर्यंत हा गैरप्रकार सुरू होता. सकाळी जेव्हा पीडितेचे आई आणि काका रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांनाही शिवीगाळ केली. यानंतर महिलेने रबाळे पोलीस गाठून आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली.
रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले की, "आरोपी डॉक्टरविरुद्ध भादंवि कलम ३५४ (विनयभंग), ३२३ (मारहाण) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे."