शनीच्या देव्हाऱ्यात महिलांनाच बंदी का?
By Admin | Updated: December 24, 2015 01:37 IST2015-12-24T01:37:30+5:302015-12-24T01:37:30+5:30
पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले.

शनीच्या देव्हाऱ्यात महिलांनाच बंदी का?
पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा समानतेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर महिलांना आपले मत व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे विचाराचे व्यासपीठ खुले करून दिले. यावेळी फक्त स्त्रियांनाच बंदी का, हा भेद कशासाठी, काही वैज्ञानिक कारणे आहेत का, असतील तर ती पटण्यासारखी आहेत का? असे अनेक सवाल त्यांनी प्रतिक्रियांमधून विचारले आहेत. काही महिलांनी जाणे का योग्य नाही, याचे स्पष्टीकरण दिले. या विषयाचा धांडोळा घेतल्यावर आज २१ व्या शतकातही महिला खरंच हतबल आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वर्गभेद, लिंगभेद, वर्णभेद या गोष्टींवर अवलंबून कुठल्याही गोष्टीचा मज्जाव होणे बरोेबर नाही. आपण काळाप्रमाणे बदलले पाहिजे. भारतात सगळ्यांनाच न्यायदेवताही समान न्याय देते. मग देवाच्या दरबारी तरी वेगळा न्याय का असावा, असा प्रश्न मला पडतो.
-मीनल उत्तुरकर, सदस्य, समता विचार प्रसारक
त्या महिलांनी मंदिरात जाऊन योग्यच केले आहे. का जाऊ नये, याचे शास्त्रशुद्ध कारण द्यावे आणि हे कारण पटण्यासारखेही असावे. कुठल्याही देवाने स्त्रियांनी आत येऊ नये, असे सांगितले नाही. - स्वराली पाटील, विद्यार्थी
शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जायला स्त्रियांचा अट्टाहास का? देवाचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. सर्वांनीच आपले हक्क आणि कर्तऱ्याचे पालन करणे गरजेचे आहे. जिथे पाहिजे तेथे स्त्रियांना त्यांचे हक्क दिले जातात. परमेश्वर एकच आहे. बाहेरून नमस्कार केला काय किंवा चौथऱ्यावर जाऊन केला तरी तो देवला पोहचाणारच आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॉस्पीटलला जातानाही आपण हात-पाय स्वच्छ धुतो, चप्पल बाहेर काढतो. मंिदर हे मन:शांती करणारे हॉस्पीटलच आहे.
-मेधा सोमण, प्राध्यापिका
महिलांना प्रवेश देणे गरजेचे आहे. मंदिरात जाऊ न देणे ही पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. हा विरोध उगाचचा आहे. अशा लिंग भेदामुळेच आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामुळेच भारत देश अजूनही विकसनशीलच राहिला आहे.
-अपर्णा कवी, इनरव्हील क्लब माजी अध्यक्ष
मंदिरात जाऊ न देणे हे चुकीचे आहे. न जाण्यामागचे काही कारणेही त्यांच्याकडे नाही. आपला समाज स्त्रीला माणूस म्हणून जगू देत नाहीत, त्यामुळे हा सगळ्या गोष्टी घडतात. डिस्क्रिमिनेशन करणे चुकीचे आहे आणि असे कुठल्याही देवाने सांगितले नाही.
-अंशुल वागळे, विद्यार्थी